चोरट्यांची कमाल : बोदवड बसस्थानकात उभ्या असलेल्या चार बसेसमधून 28 हजारांचे डिझेल लांबवले

दिवसभर बस स्थानकावर उभ्या असल्याने उत्पन्नाला फटका : चोरट्यांना शोधण्याचे आव्हान


Diesel worth Rs 28,000 stolen from four buses parked at Bodwad bus stand बोदवड (14 फेब्रुवारी 2025)  बोदवड बसस्थानकात मुक्कामी उभ्या असलेल्या चार बसेसच्या डिझेल टँकमधून तब्बल 28 हजार रुपये किंमतीचे 620 लीटर डिझेल चोरीला गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चोरट्यांची मजल थेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसेसपर्यंत गेल्यानंतर चोरट्यांना शोधण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे राहिले असून डिझेल चोरीमुळे या बसेस दिवसभर स्थानकात उभ्या असल्याने एस.टी.च्या उत्पन्नाला त्यामुळे मोठा फटका बसला.

मध्यरात्री डिझेलची केली चोरी
बसचालक किरण सीताराम सोनवणे (विदगाव, ता.जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, 13 रोजी बस (एम.एच.06 एस.8613) ही बसस्थानकात लावल्यानंतर त्यांच्यासह अन्य चालक विश्रांतीगृहात झोपण्यासाठी गेले मात्र मध्यरात्री चोरट्यांनी चारही बसमधून डिझेल लांबवल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता उघडकीस आला. चोरट्यांनी बस (क्रमांक एम.एच.06 एस.8613) मधून 165 लीटर, बस (क्रमांक एम.एच.20 बीएल 0945) मधून 160 लीटर, बस (क्रमांक एम.एच.40 एन.9097) मधून 145 लीटर, बस (क्रमांक एम.एच.40 एन.9702) मधून 150 लीटर डिझेल लांबवण्यात आले. एकूण 27 हजार 900 रुपये किंमतीचे डिझेल चोरीला गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर डेपो मॅनेजर निलेश कलाल, स्थानकप्रमुख अनिल बाविस्कर यांनी पाहणी केली. दरम्यान, चक्क बसेसमधून डिझेल चोरीला गेल्याने चालक वर्ग बस लावण्यासाठी धास्तावले आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !