भुसावळ शहरात 22 रोजी रोजगार मेळावा
स्थानिक कुशल-अकुशल बेरोजगारांना मिळणार जागीच रोजगाराची संधी
भुसावळ (17 फेब्रुवारी 2025) : शहरातील प्रोफेसर कॉलनीतील संतोषी माता सभागृहात समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान व भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळ व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या माध्यमातून बेरोजगार युवकांच्या हातांना काम मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार, 22 रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या या मेळाव्यात हजारो कुशल व अकुशल स्थानिक बेरोजगारांच्या हातांना काम मिळणार आहे.
क्यूआर कोडवर नोंदणीचे आवाहन
सक्षम अश्या व्यावसायीक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य-रोजगार-व्यवसाय करण्याच्या संधीसाठी तसेच नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द असणार्या उमेदवारांनी दिलेल्या क्यूआर कोडवर नोंदणी करावी, असे आवाहन समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान व भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळ व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगावतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला जळगावच्या श्री केशव स्मृती प्रतिष्ठान, भुसावळातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवमुद्रा प्रतिष्ठान, कवयित्री बहिणाबाई चोधरी विद्यापीठ, जळगाव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जळगावातील श्री जी.एम.फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

हजारो बेरोजगारांच्या हाताला रोजगाराची संधी
भुसावळ शहरात होणार्या रोजगार मेळाव्याला हजारो बेरोजगार कुशल-अशकुल कर्मचार्यांच्या हातांना जागीच काम मिळणार आहे. मेळाव्यासाठी क्यूआर कोडवर नोंदणी आवश्यक असून आतापर्यंत अनेक कंपन्यांनी नोंदणी केली आहे. भुसावळ शहर व तालुक्यातील बेरोजगार कुशल-अकुशल तरुणांनी मेळाव्याचा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे व आयोजकांनी केले आहे.
यांची कार्यक्रमास राहणार उपस्थिती
मंत्री संजय सावकारे, जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू व्हि.एल.माहेश्वरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आदींची उपस्थिती राहणार आहे.
