घरकुलांची कामे पूर्ण करा, वसुलीचे प्रमाण वाढवा : भुसावळात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद


भुसावळ (18 फेब्रुवारी 2025) : भुसावळ ग्रामीणमध्ये प्रलंबित असलेल्या घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा तसेच लाभार्थींची पायपीट होणार नाही या संदर्भात दखल घ्यावी तसेच मार्च एण्डपूर्वीच शंभर टक्के वसुली पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. सोमवार, 17 रोजी दुपारी त्यांनी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात ग्रामसेवक व तलाठ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, भुसावळ गटविकास अधिकारी सचिन पानझडे आदींची उपस्थिती होती.

घरकुलाचा 97 टक्के लाभ
भुसावळ तालुक्यात मूळ उद्दिष्टापैकी 97 टक्के लाभ देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात घरकुलाचा हप्ता 90 टक्के लाभार्थींपर्यंत देण्यात आल्याचे यावेळी गटविकास अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी एक ते दोन गावांमध्ये घरकुलासंदर्भात अडचणी असल्याने तातडीने लाभार्थींना घरकुलासाठी पर्यायी तागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.


विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्याच्या सूचना
जिल्हाधिकार्‍यांनी प्रांत कार्यालयातील बैठकीनंतर वेल्हाळे येथे भेट देत पाहणी केली तसेच दीपनगरातील नवीन प्रकल्पाला भेट देत अधिकार्‍यांकडून माहिती जाणत विविध विषयांवर चर्चा केली. सायंकाळी भुसावळ पंचायत समितीच्या सभागृहात शहरातील बँक अधिकार्‍यांची बैठक घेतली. विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी देत मुद्रा लोन तसेच बचत गटांना कर्ज देण्याच्या सूचना यावेळी केल्या. या बैठकीला भुसावळ शहर व तालुक्यातील मॅनेजर उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !