जळगावातील आर्किड हॉस्पीटलमधून डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करीत भंगाळे गोल्डला भामट्याचा गंडा


जळगाव (18 फेब्रुवारी 2025) :  जळगावातील भंगाळे गोल्डची आर्किड हॉस्पीटलच्या नावाने एकाने फसवणूक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
रविवारी दुपारी एक वाजून 21 मिनिटांनी जळगावातील भंगाळे गोल्ड या सोन्याच्या शोरूममध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्याने आपण आर्किड हॉस्पिटलमधून डॉक्टर जैन बोलत असल्याचे सांगितले तसेच तातडीने 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा शिक्का रुग्णालयात पाठवण्याची विनंती केली. शिक्का दिल्यानंतर त्याचे पैसे रुग्णालयात येऊन घेऊन जा, असेही त्याने कर्मचार्‍याला सांगितले.




त्यानुसार, भंगाळे गोल्डमधील कर्मचारी रामगुलाम कौशलप्रसाद त्रिपाठी (वय 65) हे 10 ग्रॅमचा सोन्याचा शिक्का घेऊन आर्किड हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांना एक अज्ञात व्यक्ती भेटली, ज्याने आपण डॉक्टर अग्रवाल असल्याचे सांगितले. त्याने कर्मचार्‍याकडून 87 हजार रुपये किंमतीचा शिक्का घेतला आणि पैसे न देताच पळ काढला.

घडलेली फसवणूक लक्षात येताच रामगुलाम त्रिपाठी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत आहेत. या घटनेमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !