रिक्षातून गांजाची वाहतूक : अमळनेर पोलिसांनी एक लाख 80 हजारांचा गांजा केला जप्त
अमळनेर (18 फेब्रुवारी 2025) : अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील आसारामजी आश्रमासमोर बेकायदेशीररित्या रिक्षातून गांजाची वाहतूक करणार्या तरुणावर अमळनेर पोलिसांनी कारवाई करीत एक लाख 80 हजार रुपये किमतीचा 18 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील श्री आसारामजी आश्रमसमोरून रिक्षांमधून अवैधपणे गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्यासह पथकाने शुक्रवारी, 14 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता कारवाई करत सुमारे एक लाख 80 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी कोमल सिंग विकास राजपूत (29, राहणार बोरखेडा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे) याला अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली रिक्षादेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.








