एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : 27 लाखांचे बायोडिझेल जप्त
जळगाव (19 फेब्रुवारी 2025) : एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन ट्रकमधील 27 लाखांचे बायोडिझेल जप्त केले. ही कारवाई जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता करण्यात आली. दोन चालकांसह त्यांच्या ट्रँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई
जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस पथक मंगळवारी रात्री दोन वाजता गस्तीवर असताना अजिंठा चौफुली येथून संशयास्पदरित्या जाणारे दोन टँकर पोलिसांनी थांबवले. त्यावेळी चालकांची चौकशी केली असता दोघांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्यानंतर पाहणीअंती दोन्ही ट्रँकरमध्ये बायोडिझेल आढळल्याने पोलिसांनी टँकर (क्रमांक जी.जे.12 बी.टी.1181) व (जे.जे.12 बी.टी.4284) जप्त केली.



चालक, मालकांविरोधात गुन्हा
दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण 27 लाख रुपये किंमतीचे बायोडिझेल असल्याने पोलीस नाईक विकास सातदिवे आणि सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक सद्दाम सय्यद अकबर (23, रा.बच्छाव, राज्य गुजरात) व लतीफ भाई फकीर मोहम्मद हिंगोरजा (24, रा.आडेचार, जि.कच्छ, राज्य गुजरात) यांच्यासह टँकरचे मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे (21, रा.उकडी, ता.बुलढाणा) आणि सुलेमान इलियास छेरेया (वरसाना कच्छ, राज्य गुजरात) या चार विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनगे करीत आहेत.





