वाघोदा पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित होत नदीत कोसळले : चालक ठार, क्लीनर गंभीर
यावल (20 फेब्रुवारी 2025) : चोपडा रस्त्यावरील सावखेडासीम गावातून दोन ट्रॉल्यामध्ये ऊस भरून ट्रॅक्टर घेऊन मंगळवारी रात्री चालक चोपड्याकडे जात असताना वाघोदा पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाले आणि थेट पुलावरून नदीपात्रात कोसळले. या दुर्घटनेत 32 वर्षीय चालक जागीच ठार झाला तर 20 वर्षीय क्लीनर हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
सावखेडासीम, ता.यावल येथून दोन ट्रॉल्यांमध्ये ऊस भरून ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 सी.व्ही.1124) घेऊन चालक राकेश जयराम बारेला (32, रा.छोटी शिरवेल, ता.सेंधवा, जि.बडवाणी) मध्य प्रदेश हा जात होता. मंगळवारी मध्यरात्री तो यावलकडून चोपड्याला जात असतांना वाघोदा गावाजवळ नदीच्या पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रीत झाले आणि थेट पुलावरून ट्रॅक्टर नदीत कोसळले. या अपघातामध्ये राकेश बारेला हा जागीच ठार झाला तर ट्रॅक्टरवरील क्लीनर राधेश्याम गंभीर बारेला (20, बोरअजंर्टीें ता.चोपडा) हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच वाघोदा गावातील नागरिकांनी मध्यरात्रीचं घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने 108 रुग्णवाहिकेला बोलवण्यात आले.



चालकाविरोधात गुन्हा
मयताचा मृतदेह आणि गंभीर जखमी राधेश्याम बारेला याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.सहर हमदुल्ले सह आदींनी त्याच्यावर प्रथम उपचार केले. राधेश्याम बारेला याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात प्रकरणी दिनकर तुकाराम महाजन यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक राकेश बारेला याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.





