यावल शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी शिव छत्रपतींची जयंती उत्साहात साजरी
यावल (20 फेब्रुवारी 2025) : शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात विविध शासकिय कार्यालय, वाचनालय, शाळा, विद्यालय व महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत अभिवान करण्यात आले.
अभिनव वाचन स्पर्धा
यावल शहरातील निंबाळकर किल्ल्यावर एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी साठी अभिनव वाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अभय रावते यांनी केले. अध्यक्षस्थानी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, अॅड.देवकांत पाटील, डॉ.नरेंद्र महाले, दिलीप महाजन, हेमराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.

साने गुरूजी विद्यालय, यावल
पी.एम.श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील यांनी केले. यावेळी उपप्राचार्य ए.एस.इंगळे, पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर, व्ही.टी.नन्नवरे, शिक्षक डी.एस.फेगडे, पी.एन.सोनवणे सह सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख इंदिरा रायसिंग यांनी केले.
चिवास सार्वजनिक वाचनालय, यावल
चिवास सार्वजनिक वाचनालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नियमित वाचक नीळकंठ यादव यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी प्रास्ताविक केले. भैय्या भोईटे, राजेश वाघ, राजेश यावलकर, दिनेश वाणी, ज्ञानेश्वर सोनवणेसह वाचक उपस्थित होते.
सरदार पटेल स्कूल, यावल
श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका शिला तायडे यांनी प्रतिमेचे पूजन केले. ’शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे हे या कार्यक्रमातून पटवून देण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
बाल संस्कार शाळा, यावल
बाल संस्कार विद्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा दोन गटात झाली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांच्याहस्ते करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम गटात रिद्धी पंकज गडे प्रथम तर द्वितीय गटात सानवी पंकज गडे प्रथम व द्वितीय क्रमांक दामिनी विकास फालक यांनी पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे पुस्तके वाचून त्यांचे कर्तृत्व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले. आभार प्रशांत महाजन, छायाचित्र व्हिडिओ चित्रीकरण अतुल पवार यांनी केले. कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावल पोलीस ठाणे व तहसील कार्यालय
यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पराजी वाघमोडे उपस्थित होते.तहसील कार्यालय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले.
उंटावद विविध कार्यकारी सोसायटी
उंटावद विकासोत छात्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अर्पण करुण महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चेअरमन शशिकांत पाटील, सरपंच छोटू भील, पोलीस पाटील हर्षल पाटील, संचालक दिलीप पाटील, विवेक पाटील, सचिव संजय महाजनसह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री क्षेत्र मनुदेवी
श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरावर शिवजयंती साजरी करण्यात आली. यात पूजेचा मान संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील व उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, समाधान पाटील यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मनुदेवी येथील दुकानदारांनी केले होते. आलेल्या भाविकांना शिरा प्रसाद म्हणून वितरण करण्यात आला. कार्यक्रमाकरीता विश्वदीप पाटीलसह सर्व दुकानदारांनी परिश्रम घेतले.
शिल्पगाराची मानवंदना
कलाध्यापक तथा साने गुरूजी विद्यालयाचे पर्यवेक्षक विजय नन्नवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प साकारून शिल्पकलेतून शिव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना दिली मानवंदना दिली.






