बदनापूरात पेपर फुटल्याचा दावा ; शिक्षण विभागाकडून मात्र दगडफेकीचा आरोप
जालना (21 फेब्रुवारी 2025) : दहावी परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली असलीतरी बदनापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील परीक्षा केंद्रावर आज पेपर फुटल्याचा दावा झाला मात्र शिक्षण विभागाने हा दावा फेटाळत पालकांनी दगडफेक केल्याचा दावा केला आहे.
पंधरा मिनिटात प्रश्नपत्रिका आली बाहेर
शुक्रवारी सुरू झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका केंद्रावर मराठी विषयाची प्रश्नपत्रिका अवघ्या पंधरा मिनिटांतच परीक्षा केंद्राबाहेर आली. त्यानंतर शहरातील झेरॉक्स सेंटरवर प्रश्नांची उत्तरे तयार करून त्याचे सेट करण्यात आले. हे सेट परीक्षा हॉलमधील विद्यार्थ्यांना चोरट्या मार्गाने पुरवण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र, प्रशासनाने असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. प्रश्न पत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी.एन.क्षीरसागर म्हणाले की, या परीक्षा केंद्रावर पेपर फुटलेला नाही. एका हॉलमध्ये बाहेरील जमावाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये खिडकीची काच फुटली आहे तसेच काही पालकांनी हॉलमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जमाव पांगवला.



पेपर फुटलाच नाही : जिल्हाधिकारी
आज काही वृत्त वाहिन्यानी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे परंतू प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.





