भुसावळ विभागात गण गण गणात बोतेचा जयघोष

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रम : दर्शनार्थ भाविकांची गर्दी


भुसावळ (21 फेब्रुवारी 2025) : श्री संत गजानन महाराजांच्या 147 व्या प्रकट दिनानिमित्त शहरासह विभागातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गण गण गणात बोतेच्या जयघोष भाविकांनी केला. भुसावळ शहरात बहुतेक ठिकाणी गजानन विजय ग्रंथांचे सामूहिक पारायण भाविकांनी केले. सकाळपासूनच भाविकांची मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

श्री गजानन महाराज देवस्थानतर्फे प्रकट दिन उत्साहात
भुसावळ : ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात श्री गजानन महाराजांचा 147 वा प्रगटदिन जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थानतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. श्रींचे स्नान अभिषेक पूजा पहाटे 5.30. ते 7.30 पर्यंत झाली. मंदिरात श्री गजानन महाराजांच्या मूर्तीस तसेच श्री रामचंद्र दरबार, श्री हनुमान, श्री विठ्ठल रखुमाई, महाराजांच्या पादुका ही आकर्षक फुलांनी सजविलेल्या होत्या. रंगीबेरंगी रांगोळ्याही परीसरात काढण्यात आल्या. मंदिरात व कळसावर रोशनाई करण्यात आली. सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायणास पहाटे सहा वाजेपासून सुरूवात झाली. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली. भाविकांना पिठलं,पोळी व बुंदीचा लाडू महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. सेवेकर्‍यांनी गर्दीने उत्कृष्ट नियोजन करीत भाविकांना सेवा दिली. पोलीस दलानेही मंदिर परीसरात भाविकांच्या झालेल्या गर्दिवर तसेच जामनेर रोडवरील वाहतुकीवर नियंत्रण राखत सेवा दिली. श्रींच्या दर्शनासाठी संध्याकाळी भाविकांची गर्दी वाढली व दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी भाविकांची गर्दी वाढू लागल्याने मंदिरासमोरील जामनेर रोडवर एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याने भाविकांची सोय झाली.


वांजोळा रोडवरील मंदिरात प्रसादाचे वाटप
जुना वांजोळा रोडवरील दत्तनगर परिसरातील रामकृष्ण नगरातील संत गजानन महाराज देवस्थानात प्रकटदिनानिमित्त ा सकाळी मूर्तीला अभिषेक, गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सायंकाळी 7 ते 9 यावेळात भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

भवानी पेठेत दिंडी
शहरातील भवानी पेठेतील विजय कुळकर्णी यांच्याकडे सकाळी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या मुर्तीस अभिषेक, पूजा, आरती होऊन पहाटे 5.30 वाजेपासून गजानन विजय ग्रंथाचे पारायण भाविकांनी केले. 11 वाजता आरती, 12 वाजता महाप्रसाद वितरण झाले. संध्याकाळी पाच वाजता भवानी पेठेतून गजानन महाराजांच्या प्रतिमेची दिंडी काढण्यात आली. यावेळी दिंडीत 50 पेक्षा जास्त भाविक होते. रात्री आठ वाजता भजन, आरती झाली. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. विजय कुळकर्णी, मंगला कुळकर्णी, भूषण, केदार कुळकर्णी यांनी परिश्रम घेतले.

गण गण गणात बोतेच्या स्वरात दुमदुमली व्यास नगरी
यावल : गुरुवारी गण गण गणात बोतेच्या स्वरात व्यासनगरी दुमदुमली. यावल शहरात मोठ्या उत्साहात श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला. संपूर्ण शहरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीत श्रींच्या पादुकांची शहरातूक मिरवणूक काढत तिचा समारोप विरार नगरातील श्री गजानन महाराज मंदिरात झाला व येथे धार्मिक कार्यक्रम पार पडत भाविक, भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आला व रात्री कीर्तन झाले.

पादुकांची पालखी मिरवणूक
यावल शहरात गुरुवारी श्री गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्साह दिसून आला. पहाटे सहा वाजेपासून विस्तारित भागात फैजपूर रस्त्यालगत विरार नगरातील श्री गजानन महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. यात सहा वाजता मूर्तीचा अभिषेक व आरती, सात वाजता लघू रुद्र याग पार पडला. शहरातील नगरपालिकेजवळील श्री रेणुकादेवी मंदिरापासून श्री गजानन महाराज यांच्या पादुकाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सवाद्य काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या कळशी पथक, लेझीम पथक आदींचा सहभाग होता. ही पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. पालखीचा समारोप दुपारी 12 वाजता श्री गजानन महाराज मंदिरात झाला व मंदिरात विविध जोडप्यांच्या हस्ते श्रींची महाआरती पार पडली. दुपारी 12 ते सायंकाळी पाच या वेळेत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, संस्थेचे अध्यक्ष आर.डी.पाटीलसह मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष आर.डी.पाटील, मंदिराचे संचालक मंडळ पी.एम.जोशी, अतुल पाटील, अशोक भंडारी, लक्ष्मण क्षीरसागर, अनिल पाठक, संजय कदम, शरद चतुर, निशा पाटील, नितीन पाटील, आदींनी परिश्रम घेतले.

असे झाले धार्मिक कार्यक्रम
पहाटे सहा वाजता श्रींच्या मूर्तीस अभिषेक व आरती करण्यात आली. सकाळी सात वाजता श्री गणेश याग, आठ वाजता श्री रेणुका देवी मंदिरापासून श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक निघाली. दुपारी 12 वाजता श्री गणेश याग पूर्णाहूती व महाआरती पार पडली तर दुपारी 12.30 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यादरम्यान दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत श्री तारकेश्वर भजनी मंडळ, यावल यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता श्री गजानन महाराजांची आरती तर रात्री 8 वाजता ह.भ.प..राधा पाटील भोलाणेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला.

साकळी येथे प्रकट दिन उत्साहात
यावल : यावल तालुक्यातील साकळी येथील मनवेल रस्त्यावर असलेल्या जोशी फार्ममधील श्री गजानन महाराज मंदिरात मंदिराचा वर्धापनदिन व श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून मंदिरात भाविक, भक्तांची गर्दी झाली होती. भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता हजरत रशीद बाबा आश्रमाचे गादीपती छोटू बाबा यांच्याहस्ते महाआरती झाली. त्यानंतर येथे भुसावळातील प्रसिद्ध कवी ज्ञानेश्वर घुले त्यांचे परब्रम्ह योगी -3 या पुस्तकाचे भाजपा महिला आघाडीच्या डॉ.केतकी पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. महाआरतीनंतर दुपारी 12 ते 2.30 या वेळेत महाप्रसाद वितरण करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी आठ ते पाच वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण वाचन करण्यात आले. त्याचा समारोपदेखील करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था तसेच हेमंत जोशी, अनिल जोशी, तनिष्क जोशी, नंदन जोशीसह जोशी परिवाराच्या वतीने करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !