परसाडे येथे खळ्याला आग, बैल दगावला, शेतकर्‍याचे दोन लाखांचे नुकसान


यावल (21 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील परसाडे येथे शेतकर्‍याच्या खळ्याला गुरूवारी अचानक आग लागली. या आगीत खळ्यातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले तर खळ्यात असलेल्या बैल जोडीतील एक बैल दगावला तर एक बैल गंभीर जखमी झाला. या आगीत शेतकर्‍याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. परसाडे गावातील शेतकरी प्रभाकर शंकर पाटील यांचे गावालगत खळे आहे. या खळ्यात गुरुवारी अचानक आग लागली.

दोन लाखांचे नुकसान
आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला व यावल नगरपालिकेच्या अग्नीशमन वाहनास पाचारण करण्यात आले. फायरमन कल्पेश बारी, कैलास काटकर, शिवाजी पवार यांनी लगबगीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर या आगीत गोठ्यात बांधलेली दोन गुरे भाजले गेले यात एकाचा मृत्यू झाला. आगीत गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य यात स्प्रिंकलर पाईप, गुरांचा चारा तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. यात शेतकर्‍याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी भेट देवून शेतकर्‍याचे सांत्वन केले. मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी तडवी यांनी नुकसानाचा पंचनामा केला.


कॉपी करू नका.