भुसावळातील पेन्शन अदालतीत तक्रारींचा निपटारा : 67 हजाराची रक्कम कर्मचार्‍यांच्या खात्यात वर्ग


भुसावळ (17 जून 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोमवारी 16 जून रोजी येथील कृष्णचंद्र सभागृहात जून महिन्यातील पेन्शन अदालतीचे आयोजन केले. या अदालतीमध्ये एकूण 49 तक्रारी प्राप्त झाल्या. ज्यात 2 वेतनविषयक आणि 47 अन्य विषयाशी संबंधित होत्या. पेन्शनधारकांच्या खात्यात 67 हजार 764 इतकी रक्कम वर्ग करण्यात आली. तसेच, पी.पी.ओचे पुनरावलोकन आणि परिवार पेन्शनचे पुनर्नियोजन यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवरही कार्यवाही करण्यात आली.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वर्षातून दोन वेळा रेल्वे प्रशासनातर्फे पेन्शन अदालत घेतली जाते. यासाठी तीन महिने आधी सूचना देऊन अर्ज मागवले जातात. यावर्षीच्या दुसर्‍या सत्रात मिळालेल्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात आली.
पेन्शन अदालतीच्या अध्यक्षस्थानी एडीआरएम सुनील कुमार सुमन होते. त्यांच्यासोबत लेखा आणि कार्मिक विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी दिलीप आर. खरात यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर मुख्य कार्यालय अधीक्षक उमाकांत बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले.


याप्रसंगी भुसावळ, खंडवा, जळगाव आणि अकोला येथील पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. एडीआरएम यांनी उपस्थित पेन्शनधारकांना आश्वासन दिले की, भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवू नयेत यासाठी प्राप्त तक्रारी वेळेत सोडवण्यात येतील. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेटलमेंट विभाग, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले, निवृत्त कर्मचार्‍यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना यावेळी समाधानकारक उत्तरे देण्यात आली. यावेळी सहाय्यक कार्मिक अधिकारी एस.जे.हिवाळे यांनी आभार मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !