चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
तापी-पूर्णा संगमावर विठू नामाचा गजर : दिवसभर दिंड्यांचे आगमन
Huge crowd of devotees for darshan of Changdev Maharaj मुक्ताईनगर (27 फेब्रुवारी 2025) : विठ्ठल नामाचा गजर करीत बुधवार, 26 रोजी महाशिवरात्रीनिमित्त गुरू-शिष्य अर्थात श्री संत मुक्ताबाई व चांगदेव महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून दिंड्या मंगळवार व बुधवारी दाखल झाल्या.

आमदारांच्या हस्ते अभिषेक
चांगदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त महाशिवरात्रीला पहाटे चार वाजता आमदार चंद्रकांत पाटील, जनता शिक्षण मंडळाचे संचालक अंकुश चौधरी, चांगदेव सरपंच निखील बोदडे, डॉ. केतकी पाटील व डॉ.वैभव पाटील यांच्याहस्ते अभिषेक करण्यात आला. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट दिली. यावेळी सर्व गुरव पुजारी परिवाराच्या हस्ते अभिषेक झाला. निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये दीपक पाटील (भुसावळ) यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आल्याचे विष्णू गुरव पुजारी म्हणाले.
गुरु-शिष्याचे भाविकांनी घेतले दर्शन
श्री संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री क्षेत्र चांगदेव येथील चांगदेव महाराज मंदिरात दाखल होत दर्शन घेत परतीचा मार्ग धरला. बुधवारी महाशिवरात्रीच्या पर्वावर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदायाचे भाविक हर हर महादेव, जय शंभोचा गजर करीत चांगदेव येथे दाखल झाले. यात्रेला आलेल्या भाविकांना जागोजागी फराळ, दूध, केळीचे वाटप करण्यात आले.
दराबासह रेवड्यांना मागणी
चांगदेव येथील यात्रेत प्रसिद्ध असलेला शिंगाड्याचा दराबा व रेवड्यांना भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी राहिली. उपवासाला शिंगाड्याचा दराबा चालत असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने खरेदी केली तर प्रसाद म्हणून रेवड्या प्रसिद्ध असल्याने भाविक रेवड्यांचीही खरेदी केली.
नौका विहाराचा भाविकांकडून आनंद
तापी-पूर्णाच्या संगमावर आलेल्या भाविकांनी नौकाविहाराचा मनमुरादपणे आनंद लूटला. दिवसभरात नौका विहारात भाविक दंग झाले होते. पाण्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनातर्फे संरक्षणाच्या दृष्टीने बोटी तयार ठेवण्यात आल्या. संरक्षक दिवसभर आपली ड्युटी बजावली. यावर्षी पहिल्यांदा संरक्षणाच्या बाबतीत चोख बंदोबस्त प्रशासनातर्फे ठेवण्यात आला. अग्निशमन बंब, राखीव पोलीस दल, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच निखील बोदडे, उपसरपंच दत्तू चौधरी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक लक्ष ठेवून होती. रस्त्यावर भाविकांना वाहतुकीचा त्रास न होण्यासाठी मोठ्या वाहनांना नवीन चांगदेव गावाजवळ अडविण्यात आले.






