भुसावळ शहरात हर हर महादेवाचा गजर
50 क्विंटल साबुदाणा खिचडी, तीन हजार डझन केळीचा प्रसाद वाटप
भुसावळ (28 फेब्रुवारी 2025) : शहरात बुधवारी महाशिवरात्री निमित्ताने शिवालयांमध्ये सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. शहरातील महादेव मंदीराचे पट सकाळी चार वाजता उघडून रात्री उशीरापर्यत सुरू होते. शहरातील अनेक मंडळे, सेवाभावी संस्था, महादेव मंदिरांमध्ये दिवसभरात तब्बल 50 क्विंटल साबुदाणा खिचडी, तीन हजार डझन केळीचे वितरण करण्यात आले. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत साबुदाणा खिचडी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. महाशिवरात्रीनिमीत्त शहरातील महादेवांच्या मंदीरांना गेल्या आठवड्यापासूनच रंगरंगोटीसह त्यावर रोषणाई करण्यात आली.
भाविकांना प्रसादाचे वाटप
शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराचे पट पहाटे चार वाजताच उघडण्यात आले. महादेवाच्या पिंडीला अभिषेक, पूजा, आरती करण्यात आली. शहरातील मंडळांसह वैयक्तीक पातळीवर दानशुरांनी साबुदाण्याची खिचडी, केळी, राजगिर्याचे लाडू, शेंगदाणा चिक्की आदींचा प्रसाद वितरण केला. शहरातील विविध भागात सकाळपासून थेट रात्रीपर्यंत तब्बल 50 क्विंटल साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद वाटप झाला.

दुग्धाभिषेक, लघूरुद्र, भजनांचे कार्यक्रम
शहरातील विविध शिवमंदिरामंध्ये महाशिवरात्री निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच भाविकांनी मंदिरामध्ये सकाळपासून दुग्धाभिषेक व जलाभिषेकासाठी गर्दी झाली. दिवसभर अनेक मंदिरामंध्ये शिवलघू रुद्र, अतीरुद्र आदींसह विविध धार्मिक अनुष्ठाने करण्यात आली. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात शिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाविकांची दिवसभर भक्तीरसाचा आनंद लूटला.
शिवालयांवर आकर्षक रोषणाई
शहरातील रानातला महादेव, काशी विश्वनाथ, सिंधी कॉलनीतील भोलबाबा मंदिर, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, जुना सतारे भागातील ओंकारेश्वर मंदिर, शांती नगरातील शिव मंदिर, तापी नदीजवळील तारकेश्वर मंदिर महाकालेश्वर मंदिर, राम मंदिर वॉर्डातील महादेव मंदिर, पाटील मळ्यातील सिध्देश्वर महादेव मंदिर, देना नगरातील काशी विश्वनाथ मंदिर, चमेली नगरातील काशी विश्वनाथ मंदिर, शिवाजी नगरातील महादेव मंदिर, विवेकानंद नगरातील महादेव मंदिर, कंदकेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांची दिवसभर गर्दी होती.
भोले बाबा की बारात लक्षवेधी
सिंधी कॉलनीतील शिवसागर मंदिरातर्फे शिवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रम झाले. सायंकाळी मंदिरातर्फे ‘भोले बाबा की बारात’ ही मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये हरियाणातील अनिल तिलकधारी यांच्या पथकाचे नृत्य झाकी दर्शन लक्षवेधी ठरले. झाँकी दर्शनामध्ये भगवान शिवपार्वती, हनुमानजी, कानतारा व कालंका माता तसेच शिवगणांची वेषभुषा केलेल्या कलावंत लक्षवेधी ठरले. बाबा श्रीचंद उदासी जूने दरबाराजवळून सुरु झालेली ही मिरवणूक जामनेररोड, सिंधी कॉलनीतील झुलेलाल चौक या मार्गावरुन निघून बडा सेवा मंडळाजवळ समारोप झाला.






