जळगावच्या हॉटेलमध्ये बैठक : हर्बल लाईफमध्ये नफ्याचाच्या आमिषाने महिलेने 66 लाख गमावले
जळगाव (2 मार्च 2025) :हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असे सांगून नगरच्या महिलेची 66 लाख 40 हजार पाच रुपयांमध्ये फसवणूक झाली. याप्रकरणी पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण
माधुरी अनिल चांदोरीकर (31, रा.रासने नगर, सावेडी, अहमदनगर) यांनी रामानंदनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव शहरातील हॉटेल चाय शाय बारमध्ये बैठक झाली व 31 जुलै 2023 ते दि. 1 मार्च 2025 पावेतो दरम्यान हा गुन्हा घडला.

फिर्यादी माधुरी चांदोरीकर यांना संशयित आरोपी आशा कमलेश रूपाणी, कमलेश हेमचंद्र रूपाणी, दीपेश कमलेश रूपाणी, आश्लेष कमलेश रूपाणी (सर्व रा.खामगाव जि. बुलढाणा, ह. मु. पर्पल व्ह्यू अपार्टमेंट, शिवम कॉलनी, जळगाव) आणि आकाश सिद्धू वर्मा (वय 32) यांनी हर्बललाईफ कंपनीत गुंतवणूक करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले.
31 जुलै 2023 ते आज पावेतो फिर्यादी माधुरी चांदोरीकर, त्यांचे पती व नातेवाईक यांच्याकडून तब्बल 86 लाख 64 हजार 999 रुपये इतकी रक्कम बँक खाते, सीडीएम मशीन आणि रोख स्वरूपात संशयित आरोपींनी घेतले आहेत. तसेच फिर्यादीला 20 लाख 24 हजार 994 रुपयांचा नफा परतावा म्हणून दिला आहे परंतु फिर्यादीने केलेल्या गुंतवणुकीवर पुढील अपेक्षित परतावा मागितला असता फिर्यादीला संशयित आरोपींकडून परतावा देण्यात आला नाही. फिर्यादीची मुद्दल 66 लाख 40 हजार 05 रुपयांची रक्कम परत न करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला.
तपास निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेत.




