भुसावळात शॉर्ट सर्किटने आग : तीन दुकाने खाक
व्यावसायीकांचे लाखोंचे नुकसान : मंत्री रक्षा खडसे यांनी केली पाहणी
भुसावळ (3 मार्च 2025) : शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीच्या प्रवेशद्वारासमोर तीन दुकानांना रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. पहाटे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाने चार बंबांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले तर व्यावसायीक आगीमुळे उघड्यावर आले आहेत.
पहाटेच्या सुमारास लागली आग
जामनेर रोडवरील आनंद नगराजवळील सिंधी कॉलनीसमोर राहुल वाघ यांचे भावना सलून शॉप तर डॉ.विद्याधर भोळे यांचा समर्थ दातांचा दवाखाना व बालाजी नास्त्याचे दुकान आहे. रविवारी पहाटे पावणेतीन वाजता एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आग लागली व पाहता-पाहता आगीची झळ सोबतच्या दोन्ही दुकानांना बसली. तीन वाजेच्या सुमारास आगीची माहिती नागरिकांना कळाल्यानंतर हर्षल परदेशी यांनी अग्निशमन दलाला जामनेर रोडवरील केंद्रात दूरध्वनीवरून सूचना दिली.

चार बबांनी विझवली आग
पालिकेच्या दोन बंबांद्वारे तसेच एक टँकरसह क्वीक रीस्क्यू व्हेईकलद्वारे पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात पहाटेच्या सुमारास यश आले. आगीमुळे मात्र राहुल वाघ यांचे सलून दुकान खाक झाले तर डॉ.विद्याधर भोळे यांच्या दातांच्या दवाखान्यातील महागड्या मशनरी जळून खाक झाल्या तर नास्त्याच्या दुकानातील साहित्याचेही आगीमुळे नुकसान झाले. या आगीत सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
यांचे आग विझवण्यासाठी परिश्रम
जामनेर रोडवरील झोन क्रमांक दोनमधील प्रभारी फायर अधिकारी प्रशांत भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन दिनेश पुरोहित, रवींद्र पाटील, गौरव सपकाळे, पवन भंगाळे, किरण जावळे, भूषण सोनवणे, रफिक शेख, मयूर भोई
ज्ञानेश्वर कुंभार, ज्ञानेश्वर पाटील, ऋषी सहानी, यश मनोरे, कुणाल परदेशी आदींनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घेतले.
मंत्री रक्षा खडसेंकडून नुकसानीची पाहणी
सिंधी कॉलनीसमोर आगीत खाक झालेल्या तीन्ही दुकानांची रविवारी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त दुकानांच्या मालकांना भेटून त्यांनी आगीची माहिती घेतली व स्थानिक प्रशासनास पंचनामा करून संबंधितांना योग्य ती मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या. यावेळी विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य व युवा मोर्चा माजी शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते.




