कोथळी यात्रोत्सवात मुलींची छेडखानी : तीन आरोपींना 5 पर्यंत पोलीस कोठडी
न्यूज नेटवर्क । भुसावळ (3 मार्च 2025) : यात्रोत्सवात गेलेल्या अल्पवयीन मुलीसह 18 वर्षीय मुलीची छेडखानी करण्यात आली होती. याप्रकरणी सात संशयीतांविरोधात रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली तर अन्य एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले होते. अटकेतील तिघांना भुसावळातील अतिरीक्त जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, याप्रकरणात तीन संशयीत पसार असून त्यांना शोधण्यासाठी तीन पथके रवाना झाली आहेत.
लोकप्रतिनिधींच्या मुलीची छेडखानी
सूत्रांच्या महितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी कोथळी गावातील यात्रोत्सवात भाजपा महिला लोकप्रतिनिधीची कन्या तिच्या अन्य मैत्रिणी पाळण्यात बसण्यासाठी गेल्यानंतर संशयीतांनी त्यांचा पाठलाग केला तसेच मोबाईलमध्ये फोटो काढून व्हिडिओ काढले. सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचार्याला संशयीतांनी धक्काबुक्की केल्याप्रकरणी सुरूवातीला पाच संशयीतांविरोधात शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर रविवारी 18 वर्षीय मुलीचा तसेच अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





