यावल शहरात भरदिवसा घरफोडी : तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
यावल (4 मार्च 2025) : शहरातील फैजपूर रस्त्यावरील विस्तारित भागातील पूर्णवाद नगरात बंद घर असल्याची संधी चोरट्याने साधत घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा तब्बल तीन लाख दोन हजारांचा मुद्देमाल लांबवला. सोमवारी दुपारी एक वाजता घरफोडीचा प्रकार समोर आला. घरफोडीमुळे विस्तारित भागात भीतीचे वातावरण पसरले.
बंद घरात चोरट्यांनी साधली संधी
यावल शहरात फैजपूर रस्त्यावर पूर्णवाद नगरात पंकज अमृत बारी राहतात. सोमवारी बारी हे आपल्या चहाच्या दुकानावर गेल्यानंतर त्यांच्या आई अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात कथा ऐकण्यासाठी गेल्य. ही संधी चोरट्याने साधत घराचे कुलूप तोडून आत कपाटात ठेवलेली एक लाख 12 हजाराची रोख रक्कम आणि एक लाख 90 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख दोन हजारांचा मुद्देमाल लांबवला.

भरदिवसा झालेल्या या घरफोडीचा प्रकार दुपारी एक वाजता पंकज बारी हे घरी गेल्यानंतर समोर आला. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार वासुदेव मराठेे करीत आहे.




