दुसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने जळगावात वॉचमनचा मृत्यू


जळगाव (5 मार्च 2025) : घराच्या बांधकामावर दुसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या वॉचमनचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडे आठ ते नऊ वाजेदरम्यान शहरातील निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराच्यामागे कंन्ट्रक्शन साईडवरील बांधकामाच्या ठिकाणी घडली. मनोहर ढेमा बारेला (वय 30, मुळ रा. उमर्‍या, ता. भगवानपूर, जिल्हा खरगोन,हमु. शिवधाम परिसर बांधकाम साईडवर घडली.

घटना कळताच मयताच्या कुटुंबातील सदस्यांना जबर मानसिक धक्का बसला. सुत्रांच्या माहितीनुसार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मनोहर बारेला हा पत्नीसह राहत होता. बांधकामाच्या ज्या साईडवर काम मिळेल, त्याठिकाणी वॉचमन म्हणून कामाला जात होता. या परिसरात एका ठेकेदाराच्या बांधकामाच्या साईडवर वॉचमन म्हणून मनोहर हा कामाला होता. समोरच एका पत्र्याच्या खोलीत कुटुंबासह राहत होता. रात्री काही कामानिमित्त तो दुसर्‍या मजल्यावर गेला होता. तोल जावून खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.


ही घटना लक्षात येताच सोबतच्या सहकार्‍यांनी आरडाओरड केली. ही वार्ता कळताच पत्नीसह परिवारातील सदस्य गर्भगळीत झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. खबर मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल फेगडे सहकार्‍यांसह घटनास्थळी रवाना झाले. एका वाहनातून जखमीला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. जखमीवर उपचार सुरु असताना त्याची प्रकृती चिंताजनक झाली. रात्री 12.30 वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी मनोहर बारेला याला मृत घोषित केले. पोलिसांनी ही वार्ता मयताच्या नातेवाईकांना कळविली.

सोमवारी ( 3 मार्च ) सकाळी मयताचे नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी घटनेचा पंचनामा हवालदार गुलाब माळी यांनी केला. तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !