जळगावात एक लाखांचा गांजा पकडला : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव (8 मार्च 2025) : अवैधरित्या गांजा बाळगुन विक्री करण्याच्या इराद्यातून वावरत असलेल्या संशयिताला सापळा रचुन एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळील 9 किलो 522 ग्रॅम गांजा होंडा युनीकॉर्न दुचाकी असा एकुण सुमारे 1 लाख सात हजार 132 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई महेरुण परिसरातील बगीचा परिसरात करण्यात आली. मुकेश विष्णु अभंगे (वय 43, रा.कंजरवाडा, तांबापुर) असे संशयिताचे नाव आहे.
एक इसम मेहरुणमधील बगीचा परिसरात गांजा बाळगुन विक्रीसाठी दुचाकीवरुन फिरत आहे,अशी गोपनीय माहिती पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना मिळाली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना हा प्रकार सांगीतला असता त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांचे पथक तयार करुन रवाना केले.
पथकाने गांजा विक्री करणार्या संशयिताचा शोध घेतला असता तो मेहरुण येथील शिवाजी उद्यानात दिसला. संशयित पसार होवू नये, यासाठी पथकाने उद्यानाच्या चारही बाजुंनी सापळा रचला.

त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कब्ज्यात एक गांजा भरलेली गोणी मिळुन आली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी फॉरेन्सीक व्हॅन घटनास्थळी पाचारण केली. पंचनामा करुन केल्यानंतर पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलम 8 (क) 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.उपनिरीक्षक सचिन नवले,पोलीस कॉन्सटेबल चेतन पाटील हे तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक योगेश बारी, कॉन्स्टेबल नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.




