रिक्षातून प्रवास करणार्या महिलेचे भामट्यांनी सव्वा लाखांचे दागिने लांबवले
जळगाव (9 मार्च 2025) : रिक्षात बसून जात असलेल्या महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागिने तीन महिलांनी हातसफाईत लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी शहरात उघडकीस आली.
वैजयंताबाई कौतीक साळुंके (वय 75, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्या भाजीविक्री करून उदरनिर्वाहाला हातभार लावतात. शुक्रवारी एका रिक्षात त्या सीटवर बसल्या. त्यांच्या बाजूला आधीच एका तरुणीसह दोन महिला बसलेल्या होत्या. वैजयंताबाई यांच्याजवळील प्रवासी बॅग रिक्षाचालकाने बसलेल्या महिलांच्या पायाजवळ हाताने ठेवली. त्यानंतर रिक्षा रस्त्यावर धावू लागली.

बॅगमधील मुद्देमाल शिताफीने काढण्यासाठी संशयित महिलांनी बॅगेवर स्कार्फ आडवा धरला. त्यानंतर एका महिलेने खुबीने बॅग उघडत त्यात ठेवलेले दागिने काढत चलाखीने लपवाछपवी केली. बॅगवर स्कार्फ आडवा का धरला, असा तक्रारदार महिलेला संशय आला.
शहरातील गांधी मार्केटसमोर प्रकाश मेडीकलजवळ रिक्षा आली असता तक्रारदार महिला त्यातून उतरल्या. त्यांनी तत्काळ बॅग उघडून तपासली असता बॅगेतील दागिने चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
50 हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चैन वजन 15 ग्रॅम, 40 हजार रुपये किमतीची एक सोन्याची पांचाळी वजन 10 ग्रॅम, 22 हजार किमतीची सोन्याची अंगठी वजन सहा ग्रॅम, असा एकूण 1 लाख, 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल संशयित महिलांनी लंपास केला. या प्रकरणी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. चौकात विविध दालने आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत, याची माहिती घेऊन फुटेज तपासले जाईल व गुन्हे तपासाच्या कामाला गती दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. हवालदार किशोर निकुंभ हे तपास करीत आहेत.




