यावल तालुक्यात खळबळ : पिंप्रीत लव्ह मॅरेज केल्याच्या रागातून मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला
यावल (9 मार्च 2025) : यावल तालुक्यातील पिंप्री येथे सख्ख्या मामाने भाचीवर प्रेम प्रकरणातून केळी कापण्याच्या बक्खीने प्राणघातक हल्ला चढवला. या तिच्या गळ्यावर वार केला असून तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तर तिला वाचवणार्या तिच्या नणंदेला देखील दुखापत झाली. शनिवारी महिला दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली.
प्रेम प्रकरणातून हल्ला
पिंप्री, ता.यावल येथे वैष्णवी विनोद तायडे (18, रा.उल्हासनगर) या तरुणीने पाडळसे येथील रहिवासी तरुण चेतन वासुदेव कोळी याच्या सोबत पळून जात लग्न केले व ती नंदोईच्या घरी आली. याची माहिती पाडळसेतील रहिवासी तिचा मामा उमाकांत चिंधू कोळी याला मिळाली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तो पिंप्री येथे दाखल झाला व त्याने भाची वैष्णवी हिच्यावर थेट केळी कापणीचा विळा बक्खीने वार केला. तिला वाचवण्याकरीता तिची नणंद वैशाली सपकाळे (27) ही धावून आली व तिलादेखील हाताला व डोक्याला दुखापत झाली. वैष्णवी ही उमाकांत कोळी यांच्याकडे लहानाची मोठी झाली व तिने प्रेमविवाह केल्याचा राग उमाकांत याला आल्याने त्याने हे कृत्य केले. नागरिकांनी उमाकांतच्या तावडीतून दोन्ही महिलांना सोडविले व त्यास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. जखमी तरुणीवर व वैशाली सपकाळेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. वैष्णवीची तब्येत गंभीर असल्याने तिला जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. याबाबत यावल पोलिसात रात्री उशीरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते.

महिला दिनी घडलेल्या घटनेमुळे खळबळ
ऐन महिला दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पाडळसे गावातील तरुण व मामाकडे पाडळसे येथे शिक्षणासाठी आलेल्या या तरुणीचे प्रेमसुत जुळल्यानंतर त्यांनी लग्न केल्याची माहिती आहे.




