पाण्याची टाकी साफ करताना चार कामगारांचा मृत्यू
मुंबई (9 मार्च 2025) : पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना मुंबईतील नागपाडा येथे रविवारी घडली.
अग्निशमन अधिकार्याने सांगितले की, पाच कामगार पाण्याच्या टाकीत साफसफाई करण्यासाठी गेले होते, पण काम करत असताना ते बेशुद्ध पडले. बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली अन् त्यांनी सर्वांना तातडीने शासकीय जेजे रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी यापैकी चार जणांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 ते 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. जेजे मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत मस्तान तालाबजवळील दिमतीमकर रोडवरील बिस्मिल्ला स्पेस नावाच्या बांधकामाधीन इमारतीमधील भूमिगत पाण्याच्या टाकीत हे सर्व उतरले होते. सुरुवातीला पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी नंतर या घटनेला दुजोरा देत चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाचव्या मजुराची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले.
मृतांमध्ये हसीपाल शेख (19), राजा शेख (20), झियाउल्ला शेख (36) आणि इमांडू शेख(38) यांचा समावेश आहे. तर पुरहान शेख (31) ची प्रकृती ठीक आहे.




