भरधाव दुचाकी धडकल्या : आचेगावातील वयोवृद्ध ठार, एक गंभीर जखमी
भुसावळ (10 मार्च 2025) : वरणगावहून आचेगावकडे जाणार्या इसमाच्या दुचाकीला समोरून येणार्या भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने आचेगावातील 70 वर्षीय वृद्ध ठार झाला तर अन्य एक जण गंभीर झाला. हा अपघात रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वरणगाव ते बोदवड मार्गावरील सुसरी गावाजवळ घडला. शरद भास्कर पाटील (70, आचेगाव) असे मयताचे नाव आहे.
काय घडले नेमके
शरद पाटील हे दुचाकी (एम.एच.19 एएस 6991) ने आचेगावकडे जात असताना भरधाव वेगात समोरून येणारी दुचाकी (एम.एच.28 बी.एस.9141) ने धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक शेख गनी शेख मौलाना (66) व त्याच्यासोबतचे अशोक रामदास खराटे (55, दोघे रा.बोदवड) जखमी झाले. तिघा जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर शरद भास्कर पाटील यांना मृत घोषित करण्यात आले तर शेख गनी शेख मौलाना सोबत अशोक खराटे यांचे डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपाचारार्थ हलविण्यात आले. वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रावण जवरे करीत आहेत.





