चाळीसगाव शहरात विवाहितेची आत्महत्या : तलाठी पतीसह तिघांना अटक
चाळीसगाव (10 मार्च 2025) : शहरातील धुळे रोड भागातील पोस्टल कॉलनीतील 25 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून तसेच पतीच्या प्रेमसंबंधाला वैतागून आत्महत्या केल्याची घटना 9 रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पूजा राहुल आल्हाट (25, धुळे रोड, पोस्टल कॉलनी, चाळीसगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे
सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या
मयत विवाहितेची आई कस्तुराबाई धर्मा राखपसरे (40, महादेव नगर, मालेगाव कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी पूजा आल्हाट हिचा सासरच्या मंडळींनी छळ केला तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. संशयीत राहुल आल्हाट याचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याने या प्रकाराला पीडीता कंटाळली व तिने रविवार, 9 मार्च रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी आत्महत्या केली. याप्रकरणी संशयीत आरोपी पती व तलाठी राहुल कचरु आल्हाट, सासु मायाबाई कचरु आल्हाट, दीर तेजस कचरु आल्हाट (सर्व रा. चाळीसगाव) व निकीता जाधव (सर्व रा.चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जाधव व्यतिरीक्त पती, सासु व दीराला अटक करण्यात आली. तपास पोलीस निीरक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





