चाळीसगाव तालुक्यातील वाघळीत धाडसी घरफोडी : साडेपाच लाखांचा ऐवज चोरीला


चाळीसगाव (10 मार्च 2025) :  चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे कुटूंब गच्चीवर झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांची घरफोडी केली. याप्रकाराने गावातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुटूंब गच्चीवर, चोरटे दारावर
वाघळी येथे शेतकरी तथा दुग्ध व्यावसायीक भागवत महादू खैरे (73, सरकारी दवाखान्याजवळ, वाघळी) परिवारासह वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री त्यांचा मोठा मुलगा शेतात तसेच लहान मुलगा पत्नीसह वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले तर भागवत खैरे खालच्या घराला कुलूप लाऊन दुसर्‍या घरी झोपण्यास गेले. चोरट्यांनी संधी साधत 8 रोजी रात्री दहा ते 9 रोजीच्या पहाटे पाच दरम्यान घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

साडेपाच लाखांचे दागिने लंपास
चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रोकड, 40 ग्रॅम वजनाच्या व एक लाख 40 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, 52 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, 20 ग्रॅम वजनाची व 70 हजार रुपये किंमतीची मंगलपोत मिळून एकूण पाच लाख 47 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात भागवत खैरे यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धात्रक करीत आहेत.


कॉपी करू नका.