अहिल्यादेवी होळकरांच्या कार्य कर्तृत्वाने भारावले भुसावळकर !

प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजन : भुसावळ कलावंतांची खाण ः मंत्री संजय सावकारे


भुसावळ (10 मार्च 2025) : महाराष्ट्रातील पितृसत्ताक संस्कृतीला आव्हान देणार्‍यांपैकी एक नाव अर्थातच अहिल्यादेवी होळकर….वयाच्या आठव्या वर्षी लग्न…व 21 व्या वर्षी आलेल्या वैधव्यानंतर सती न जाता सासरे मल्हारराव होळकरांच्या पाठबळामुळे 28 वर्ष राज्य कारभार चालवण्याची मिळालेली संधी.. राज्यकारभारात आलेल्या अनंत अडचणी, केलेले विविधांगी सामाजिक कार्य असो वा युद्ध असो की संकट स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने खंबीरपणे उभी राहू शकते, असा सकारात्मक विचार स्त्रियांच्या मनात रुजवणार्‍या अहिल्यादेवींचा जीवनपट स्थानिक कलाकारांनी उलगडून दाखवला. तब्बल 70 मिनिटे अखंड चाललेल्या या नाटीकेने भुसावळकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. निमित्त होते ते भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे स्टार लॉनमध्ये आयोजित अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावरील नाटीकेचे..!

मर्दानी खेळांचे सादरीकरण : स्त्री शक्तीचा सन्मान
कार्यक्रमाच्या सुरूवातीला वरणगाव शहरातील मुलींनी मर्दानी शिवकालीन खेळांचे सादरीकरण करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ तालुक्यातील दोन महिलांचा सत्कार करण्यात आला. इनरव्हीलसारख्या इंटरनॅशनल संस्थेच्या खजिनदारपदी भारतातील पहिली महिला होण्याचा मान मिळवणार्‍या भुसावळच्या रश्मी शर्मा व पिंपळगाव येथील बचत गटाच्या महिलांसाठी उत्कृष्ट कार्य करणार्‍या तसेच दालमिलचा व्यवसाय करणार्‍या कल्पना बडगुजर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहृदय सत्कार करण्यात आला.

प्रतिष्ठा मंडळाने उलगडला गौरवशाही इतिहास
कार्यक्रमाच्या सुरूवातीला गणेश वंदना सादर करण्यात आली. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सदस्यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास ‘महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी’ या गीताद्वारे उलगडला.

अहिल्यादेवींच्या कार्याला भुसावळकरांचे वंदन
मराठ्यांच्या इतिहासात दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ता म्हणून आदराने अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेतले जाते. होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रतिष्ठा महिला महिला मंडळाच्या माध्यमातून रविवार, 9 रोजी शहरातील स्टार लॉनमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारीत नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले. तब्बल 70 मिनिटांच्या या नाटीकेत अहिल्यादेवींचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला. भुसावळकरांनी उत्स्फूर्तपणे या नाटीकेला दाद देत स्थानिक कलावंतांचे कौतुक केले. नाटकातील सर्वच कलावंतांनी तत्कालीन वेषभूषा साकारत नाटीकेत जिवंतपणा आणला. मल्हारराव होळकरांच्या अश्वारूढ इन्ट्रीने प्रेक्षकांची दाद मिळवली तर भव्य स्टेज, अत्याधूनिक लाईटांची रोशनाई व तितक्याच दमदार पद्धत्तीने कलावंतांचा नाटकातील संवादाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली.

नवख्या कलावंतांनी जिंकली मने
अहिल्यादेवींच्या जीवनावर नाटीका सादर करणार्‍या कलावंतांत कुणीही अनुभवी कलावंत नव्हते. सर्व स्थानिक कलावंतांना या नाटीकेत सहभागी करून घेण्यात आले. सीए, डॉक्टर, गृहिणी, व्यावसायीक, तरुण आदींनी अत्यंत खुबीने आपापली भूमिका वठवली. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म, राज्याभिषेक, मृत्यूपर्यंतचे सर्व सजीव प्रसंग कलावंतांनी साकारत भूमिकेत जीव ओतला. सागर पचेरवाल, अजय पाटील यांच्या कोरीओग्राफीने नाटक अधिकच बहारदार झाले.

जवाबदार्‍या सांभाळत निभावली भूमिका
अहिल्यादेवींचे बालपन, तरुणपण व मृत्यूपर्यंतचा प्रवास पाच भूमिकेतून सादर करण्यात आला. त्यात पायल पवार, श्रृती, प्रचिती जोशी, रजनी सावकारे, अमित जोशी यांनी अहिल्यादेवींची भूमिका वठवली. मल्हारराव होळकर (अहिल्यादेवींचे सासरे) यांची भूमिका डॉ.मकरंद चांदवडकर तर खंडेराव होळकर (अहिल्यादेवींचे पती) यांची भूमिका सी.ए.विशाल शाह यांनी वठवली.
पूजार्‍याची भूमिका व्यावसायीक अमित भडंग यांनी निभावली. या नाटीकेतील बहुतांश कलावंत असलेल्या सिंधी बांधवांनी आपला व्यवसाय सांभाळून नाटीकेला वेळ दिला तर महिलांनी घराच्या जवाबदार्‍या सांभाळून नाटीका जिवंत केली.

आपण आधी सर्व भारतीय : रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, महान पुरूषांना जातीच्या बंधनात न अडकवता त्यांच्या जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची आजच्या पिढीला आवश्यकता आहे. भारतातील महान पुरूष, संतांचा इतिहास आजच्या पिढीतील प्रत्येकाला कळावा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठा मंडळातर्फे करण्यात येते. यापूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, भगतसिंग, राणी पद्मावती यांच्या जीवनकार्यावर नाटीका सादर झाल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

भुसावळ शहर कलावंतांची खान : मंत्री संजय सावकारे
मंत्री संजय सावकारे मनोगतात म्हणाले की, भुसावळसारख्या छोट्याशा शहरात टॅलेंटची कमी नाही. येथल्या कलावंतांना वाव देण्याची गरज आहे. मी या शहराचा नागरिक असल्याचा मला अभिमान असून भुसावळ ही कलावंतांची खान आहे. शहराचे सांस्कृतिक वैभव टिकून राहण्यासाठी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे राबवण्यात येत असलेले उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. भुसावळची सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यासाठी छान कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात, असेही ते म्हणाले.

इतिहासाला उजाळा ; कौतुकास्पद उपक्रम : महामंडलेश्वर
महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी संपूर्ण वेळ उपस्थित राहत नाटीका पाहिल्यानंतर मनोगतात सांगितले की, प्रतिष्ठा मंडळाने ठरवले असते तर प्रोफेशनल कलावंत बोलावून नाटकाचे सादरीकरण करता आले असते मात्र स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आल्याने त्यांच्यातील दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. स्थानिक कलावंतांनी अत्यंत मेहनत घेवून अत्यंत बोलकी भूमिका साकारून इतिहास जागृत केल्याने खरोखरच हा उपक्रम कौतुकास्पद आहे. जनार्दन महाराज पुढे म्हणाले की, मंत्री संजय सावकारे यांचे साधे राहणीमान प्रत्येकालाच भावते. मंत्री असलेतरी त्यांचे वाहन कधीही सायरन वाजवत आल्याचे उदाहरण नाही त्यामुळे त्यातून त्यांच्यातला साधेपणा स्पष्ट होतो.

प्रतिष्ठा मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद : पोलीस उपअधीक्षक
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले की, भुसावळात आल्यानंतर आतापर्यंत प्रतिष्ठा मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून हजेरी दिली आहे. प्रत्येक वेळी दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण होते. मी पुढचा कार्यक्रम कधी होणार ? याची आतुरतेने वाट पाहतो. स्थानिक कलावंतांनी जीव ओतून काम केले आहे, त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.

व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, डॉ.संगीता बियाणी, रश्मी शर्मा, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आदींची उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी करून आभारही मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. स्टार लॉन तसेच भुसावळातील बियाणी स्कूल व वरुण इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

 


कॉपी करू नका.