शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकपदी किशोरकुमार परदेशी

धुळे (10 मार्च 2025) : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी किशोरकुमार भालसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशी हे यापूर्वी दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्त होते. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी नियुक्तीचे आदेश सोमवारी सायंकाळी काढले आहेत.
उद्या पदभार स्वीकारणार
शिरपूर शहरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी शिव प्रतिष्ठानच्या पदाधिकार्याला मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निरीक्षक पाटील यांचे निलंबन करण्यात आल्याने तात्पुरता पदभार शिरपूर तालुक्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे सोपवण्यात आला होता मात्र पद रिक्त असल्याने या जागेवर दोंडाईचा प्रभारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार भालसिंग परदेशी यांची नियुक्ती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी सायंकाळी एका आदेशान्वये केली आहे. मंगळवारी ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. दोंडाईचा ठाण्याचा पदभार गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


