महिला भगिनींना दिला जाणारा पुरस्कार तिला स्वावलंबी बनवतो : डॉ.छाया चौधरी

भुसावळ (11 मार्च 2025) : महिला भगिनींना दिला जाणारा पुरस्कार हा तिला स्वावलंबी बनवतो, तिला प्रेरणा देतो, स्फूर्ती देतो, समाजाचं आम्ही काहीतरी देणं घेणं लागतो याची जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण होते, या पुरस्कारामुळे तिची जबाबदारी वाढते असे प्रतिपादन भुसावळ येथील प्रतिथयश डॉ.छाया चौधरी यांनी केले. भुसावळ येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळ्याचे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ.छाया चौधरी, इनरव्हील क्लबच्या ऑफ भुसावळ रेलसिटीच्या अध्यक्षा मीनाक्षी नितीन धांडे, सेक्रेटरी किरण जावळे उपस्थित होत्या. इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने दरवर्षी अत्यंत कठोर परिश्रमातून ज्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या अशा कर्तृत्ववान महिलांचा ‘उंच माझा झोका’ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार मंगला भीमराव पाटील, कोमल संदीप महाजन, मालतीबाई रमेश कुरकुरे, नीलिमा महेश बोंडे, डॉ.वैशाली रुपेश निकुंभ या महिला भगिनींना देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन रेवती सोनू मांडे या होत्या. प्रसंगी डॉ.मृणाल पाटील यांनी त्यांच्या वतीने लक्ष्मी योगेश सांगळे या महिला भगिनीला शिवण मशीन भेट म्हणून दिले. या शिवण मशीनच्या माध्यमातून लक्ष्मी चांगळे या स्वतःच्या पायावर उभे राहतील, असा विश्वास डॉ.मृणाल पाटील यांनी व्यक्त केला. लक्ष्मी चांगळे म्हणाल्या की, मला मिळालेल्या शिलाई मशीनमुळे मी स्वतःच्या पायावर उभी राहून स्वावलंबी होईल. सूत्रसंचालन व पुरस्कार्थी महिला भगिनींचा परिचय विनीता सुनील नेवे यांनी दिला. आभार सेक्रेटरी किरण जावळे यांनी मानले.


