प्रति जेजुरी फैजपूर खंडोबा यात्रोत्सवाला 13 पासून सुरूवात

फैजपूर (11 मार्च 2025) : प्रति जेजुरी ओळख असलेल्या श्री खंडोबा मंदिराचा 10 दिवशीय यात्रोत्सवाला गुरुवार, 13 मार्चपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून तयारीला वेग आला आहे.
यात्रोत्सवाचे जपावे पावित्र्य
मंदिराची धार्मिकता जपण्यासाठी काही कटू निर्णय घेणे अपेक्षित आहेत. यात्रोत्सवात खुलेआमपणे अवैध धंदे चालतात शिवाय भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होते, गुंडगिरी, महिला मुलींची छेडछाड टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त लावण्याची अपेक्षा आहे.
थोर पुरूषांच्या देवस्थानाला भेटी
देवस्थानाला राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित नेहरु, सरहद गांधी, डॉ.राजेंद्र प्रसाद, अहिल्याबाई होळकर, नरेश होळकर, विनोबा भावे, आमदार सिंधुताई चौधरी, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ आदी थोरा-मोठ्यांनी आणि राजकीय नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री जे.टी. महाजन, मधुकरराव चौधरी, हरिभाऊ जावळे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेश जैन, मंत्री गुलाब पाटील, मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आदी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे तर काही काळ बालपण वास्तव्य येथे गेले आहे.
अशी आहे मंदिराची आख्यायिका
जवळच असलेल्या न्हावी गावात त्याकाळी ग्रामस्थांनी कुलदैवत श्री खंडोबा भगवान मंदिर बांधले. या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी फैजपूर येथून नेली जातं असता वाटेतील एका विहिरीवर ही भाविक मंडळी विसाव्यासाठी थांबली असता या जागेवरून मूर्ती ठेवलेली बैलगाडी काही करता हालेनाशी झाली. अथक परिश्रम करीत बारा बैलजोड्या जुंपूनही बैलगाडी तसुभरही हलली नाही. खंडोबाने होळकर राजे व ग्रामस्थांना दिलेल्या दृष्टांतानुसार या जागी मंदिर बांधून या खंडोबाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे सांगितले. त्यानंतर होळकर घराण्याच्या उपस्थितीत व काशीच्या पुरोहितानी विधीवत वेदोक्त पूजा, यज्ञाद्वारे फाल्गुन पौर्णिमा होळीच्या दिवशी स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने गावात पाच दिवस सामूहिक आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हाच मंदिर स्थापना आनंदोत्सव आजही अखंडित यात्रोत्सवाद्वारे साजरा केल जातो. हा यात्रोत्सव देश व विदेशात नावारूपाला आला आहे.
गुळाची रेवडी प्रसिद्ध
यात्रोत्सवात खवय्यांसाठी प्रसिध्द अशी गुळाची रेवडी तर धनजीशेठची गाठी शेव, दराबा, जिलेबी, उसाचा रस, तर मनोरंजनासाठी महाकाय विद्युत पाळणे, मौत का कँुवा, तमाशा फड , सर्कस आणि ज्वेलरीची दुकाने, संसारोपयोगी भांडी व साहित्याची दुकाने थाटण्यात येतात व मोठी आर्थिक उलाढाल त्याद्वारे होते.
शिलालेख देतो इतिहासाची साक्ष
पुरातन काळ्या पाषाणची मूर्ती भग्न झाल्याने 7 डिसेंबर 1944 रोजी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा होळीच्या दिवशी जीर्णोद्धारासाठी राजस्थानातील रामकुमार जयपूरवाले यांनी घडविलेल्या पांढर्या शुभ्र संगमरवरी पाषाणातील खंडोबा -म्हाळसा-बाणाई या तीनही विलोभनीय मूर्ती इंदोर राजा नरेश होळकर सरकार यांनी तत्कालीन महंत आत्मानंददासजी यांना दिल्या असल्याचा शिलालेख मंदिराच्या द्वारावर आहे. तो या इतिहासाची,साक्ष देतो. जेजुरीनंतर सर्वोत मोठी अश्वारूत खंडोबाची व म्हाळसाई, बानू देवीच्या अत्यंत जागृत व विलोभनीय मूर्ती येथे आहेत. या जागृत देवस्थानाला खान्देश (कान्हादेश) ची प्रति जेजुरी म्हणून ओळखले जाते. खंडोबा किंवा मल्हारी मार्तंड समस्त लेवा पाटीदार, धनगर, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशतील बहुतांश घराण्याचे ते कुलदेवत आहे. पुरातन काळात मानवाला मनी व मल्ल असुरांच्या त्रासातून मुक्ती करण्यासाठी साक्षात भगवान शिवशंकराचा उग्र अवतार कार्य भगवान खंडोबा होय. हिंदू-मुस्लिम समाजाच्या सलोख्याचेही उदाहरण आहे. हिंदूचा खंडोबा तर मुस्लिमाचा घोडेवाले बाबा म्हणून लाखो भाविक यात्रोत्सव काळात येथे नतमस्तक होतात व आपल्या मनोकामना व्यक्त करतात तर नवस फेडण्यासाठीही भाविक येतात.
मंदिर गादीपतींची ऐतिहासीक पार्श्वभूमी व अपेक्षा
मंदिराचे तत्कालीन गादीपती महंत आत्मनंददासजी महाराज यांनी विनोबा भावेंसोबत भुदान आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. वाढत्या धार्मिक कार्य बघता छोट्या टूमदार मंदिराचा भव्य जीर्णोद्धार कार्य 1944 साली केला आहे. त्यानंतर त्यांचे शिष्य तत्कालीन गादीपती तथा माजी उपनगराध्यक्ष महंत घनश्यामदासजी महाराज यांनीही माजी आमदार सिंधुताई चौधरी सोबत गो मुक्ती आंदोलनात सिंहाचा वाटा घेतला होता तसेच शेती व दुध व्यवसायाचे अथक परिश्रमातून सन 1998 मध्ये मंदिराचा पुन्हा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला. सर्व सुखसोयी परिसरात उपलब्ध करण्यात आल्या. विवाह सोहळ्यासाठी पाच बहुउद्देशीय मंगल कार्यालये उभारण्यात आली आहेत. विद्यमान गादीपती महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तम दासजी महाराज त्यांचे पट्टशिष्य तथा उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवनकुमार दासजी महाराज यांनीही मंदिर विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्य शासनाच्या मदतीतून सुसज्य भक्त निवास व जलकुंभाची निर्मिती केली व सकाळ संध्याकाळी नित्य षोडोपचार महा अभिषेक, पूजा, आरती केली जाते. वर्षभरात चंपाषष्ठी, महाशिवरात्री, कावड यात्रा, एकादशीसह राष्ट्रमंदिर रामजन्मभूमी जीर्णोद्धारप्रसंगी सव्वा लक्ष दीपोत्सव, विविध धार्मिक पूजा अनुष्ठान मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
प्रशासकांनी घेतली बैठक
यात्रा महोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी फैजपूर प्रांताधिकारी तथा प्रशासक बबनराव काकडे यांनी नुकतीच सर्व समवेशक अधिकारी वर्गाची बैठक घेत सूचना दिल्या. पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त राखण्यात येणार असल्याची माहिती सहा.निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी दिली.
नियमांचे पालन करा, स्वच्छता राखा
सालाबादाप्रमाणे भरणार्या धार्मिक यात्रेत भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच एकाचवेळी गर्दी करू नये. यात्रोत्सव दहा दिवस चालणार आहे. त्यामुळे सर्वांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळेल. मंदिर परिसर व यात्रोत्सवात स्वच्छता राखावी, नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंदिराचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवनकुमारदासजी यांनी केले आहे.


