जळगाव एलसीबीची डॅशिंग कामगिरी : मध्यप्रदेशातील कुविख्यात टोळीकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव पोलीस अधीक्षकांची माहिती : चाळीसगाव, मुक्ताईनगर, भडगाव, अमळनेर तालुक्यातील गुन्ह्यंची उकल

जळगाव (12 मार्च 2025) : जळगाव जिल्ह्यातील बड्या लग्न समारंभातून किंमती दागिणे तसेच वयोवृद्धांकडील रोकड संधी साधून चोरट्यांच्या टोळीने लांबवली होती. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. जळगाव गुन्हे शाखेने गुन्हे करणार्या टोळीची पद्धत शोधत ही टोळी मध्यप्रदेशातील गुलखेडी, कडीया सांसी, ता.नरसिंहगढ, जि.राजगढ येथील असल्याचे निष्पन्न करीत तेथे पथक पाठवले. पथकाची चाहूल लागताच टोळी पसार झाली मात्र आरोपी घर झडतीतून चार चोरीतील सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यंत्रणेला यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
चार चोर्यांची उकल : 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील निंबा पाटील यांच्या मुलीचे लग्न 17 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील विराम लॉन्स येथे होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी लाखोंच्या दागिन्यांची पिशवी चोरून नेली होती. चाळीसगावच्या विराम गार्डन लॉन्समध्ये ही घटना घडल्यानंतर 17 फेब्रुवारी 2025 चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच मुक्ताईनगरसह भडगाव व अमळनेर येथे वयोवृद्धांकडील पैशांच्या बॅगा चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक मदतीच्या आधारे टोळी निष्पन्न केली व मध्यप्रदेशातील आरोपींच्या घरी छापेमारी केली. आरोपी पसार झाले मात्र त्यांच्या घरातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण हद्दीतील चोरी प्रकरणी 12 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर मुक्ताईनगर हद्दीतील चोरी प्रकरणी दिड लाखांची रोकड जप्त करण्यात आली. भडगाव हद्दीतील चोरी प्रकरणी एक लाख 35 हजारांची रोकड जप्त करण्यात आली तसेच अमळनेर हद्दीतील चोरी प्रकरणी 40 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड चाळीसगाव ग्रामीण निरीक्षक राहुल पवार, मुक्ताईनगर निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, गणेश वाघमारे, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, महेश पाटील, महेश सोमवंशी, हवालदार नितीन सोनवणे, किरण देवरे, मुक्ताईनगरचे हवालदार राजकुमार चव्हाण, सुरेश मेढे, सुनील मोरे आदींच्या पथकाने केली.


