गिरणा पात्रातून वाळू चोरीचे ट्रॅक्टर नेले पळवून

जळगाव (12 मार्च 2025) : गिरणानदी पात्रातून अवैधरीत्या उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक करणार्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न करूनही चालकाने सुसाट वेगात पळवून नेले. सोमवारी (10 मार्च) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मोहाडी तलाठी कार्यालयाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी तक्रारीनुसार चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाल रंगाच्या टॅक्टरला विनाक्रमांकाची ट्रॉली जोडलेली होती. तिच्यातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती. हा प्रकार महसूल पथकाच्या लक्षात येताच हे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळवून नेले. या ट्रॉलीत एक ब्रॉस वाळू भरलेली होती. ग्राम महसूल अधिकारी कविता तायडे यांच्या तक्रारीनुसार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार समाधान टहाकळे तपास करीत आहेत.


