अकलूदच्या पीठ गिरणी चालकाची भुसावळातील तापी पात्रात आत्महत्या


भुसावळ (12 मार्च 2025) :l शहरातील तापी नदीपात्रात अकलूद, ता.यावल येथील 65 वर्षीय पीठ गिरणी चालकाचा बुधवार, 12 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. प्रभाकर कडू पाटील (65, अकलूद, ता.यावल) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी फैजपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, प्रभाकर पाटील हे दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला.

अचानक घेतली उडी
बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रभाकर पाटील यांचा मृतदेह तापी पात्रात फुगलेल्या अवस्थेत बाहेर आल्यानंतर नागरिकांनी शहर पोलिसांना सूचित केले. शहर पोलिसांनी धाव घेतली मात्र घटनास्थळ फैजपूर हद्दीत असल्याने फैजपूर पोलिसांना सूचित करण्यात आले. फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, हवालदार मोती पवार, विकास सोनवणे आदींनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढत यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रभाकर पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.

दोन दिवसांपूर्वीच पाटील हे घराबाहेर पडले व बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूची वार्ता बुधवारी समोर आली. मयताच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. हवालदार मोती पवार यांच्या खबरीनुसार फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.