पाच हजारांची लाच घेताना जळगावातील आयकर अधिकार्यासह शिपाई सीबीआयच्या जाळ्यात

Income Tax officer and constable in Jalgaon caught by CBI while accepting bribe of Rs. 5,000 जळगाव (13 मार्च 2025) : नवीन पॅन कार्ड रद्द करण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच शिपायाच्या माध्यमातून स्वीकारताच जळगावातील आयकर अधिकार्याला सीबीआयने अटक केली. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. राकेश रंजन उमेश झा (35, रा.जळगाव) असे अटकेतील अधिकार्याचे तर ज्ञानेश्वर सोनवणे (38, रा.पाचोरा) असे शिपायाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण
पारोळ्यातील महिला डॉक्टरांचे 2018 मध्ये पॅन कार्ड हरवले होते. त्यामुळे त्यांनी नवीन पॅन कार्ड मिळावे म्हणून अर्ज केला होता आणि त्या अर्जानुसार त्यांना नवीन पॅन कार्ड सुद्धा मिळाले मात्र 2018 ते 2021 या वर्षाचा त्यांचा आयकर भरला गेला नाही. महिला डॉक्टरांच्या सीए यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना जुन्या आणि नव्या पॅन कार्डचे नंबर वेगवेगळे असल्याचे आढळल्याने आयकर भरला गेला नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टरांनी नवीन पॅन कार्ड रद्द करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला मात्र पॅन कार्ड रद्द झाले नाही. डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी यांनी जळगावातील आयकर अधिकारी राकेशरंजन उमेश झा यांची भेट घेतली व त्यांनी सुचवल्याप्रमाणे महिला डॉक्टरांनी कागदपत्रे सादर करूनही पॅन कार्ड रद्द झाले नाही.
लाच स्वीकारताच दोघांना अटक
हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी 10 मार्चला आयकर कार्यालयात गेले असता आयकर अधिकारी यांनी 10 हजारांची लाच मागितली. ही बाब हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकार्यांनी लागलीच डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी पुणे सीबीआयकडे तक्रार केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले व लाचेची रक्कम शिपाई सोनवणेकडे देण्यास सांगितले व शिपायाने लाच स्वीकारताच आयकर अधिकारी राकेशरंजन यास यासदेखील पुणे सीबीआयने जुन्या बीजे मार्केटमधील आयकर विभागाच्या कार्यालयातून अटक केली. दरम्यान, आयकर अधिकार्याला न्यायालयीन तर शिपायाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


