निवृत्त अधिकार्‍यास डिजिटल अ‍ॅरेस्ट करीत 30 लाखांचा गंडा


छत्रपती संभाजीनगर (13 मार्च 2025) : पॅन कार्डचा देश विघातक कृत्यासाठी वापर झाला असल्याचे भासवून सेवानिवृत्त अतिरिक्त उद्योग संचालकास डिजिटल अरेस्ट करीत 30 लाख रुपये खात्यात वळते करण्यात आले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेचे अधिकारी बोलत असल्याचे भासवले
अतिरिक्त उद्योग संचालक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या विश्वनाथ लक्ष्मणराव राजळे यांना अज्ञात क्रमांकावरून कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचा कॉल आला. त्यांनी तुमच्या नावाने पार्सल आले आहे, असे म्हणत अजय जैन यांच्याशी बोलण्यास सांगण्यात आले. त्याने, ‘तुमच्या नावाने तैवान येथून एक पार्सल आले असून, ड्रग्ज आढळल्याने ते मुंबई येथील कस्टम विभागाकडून रोखून ठेवले आहे,’ असे सांगितले. त्याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांशी बोला, असे सांगून दुसर्‍या व्यक्तीकडे फोन दिला. त्याने, ‘तुमचे आधार कार्ड देशविघातक कार्यासाठी वापरले आहे. तुमच्या यातील सहभागाची चौकशी सुरू आहे. या कालावधीत तुम्ही अन्य कुठले व्यवहार करू नये यासाठी तुमच्या ‘एफडी’ची रक्कम ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावी लागेल,’ अशी थाप मारली.

राजळे यांनी त्यांच्या खात्यावरील ‘एफडी’ची 30 लाख 40 हजारांची रक्कम समोरच्या व्यक्तीने दिलेल्या एसबीआयच्या बँक खात्यावर पाठवली. त्यानंतर अर्ध्या तासाने राजाळे यांनी कॉल केला असता अजून म्यॅच्युअल फंडमधील रक्कम लिक्विडेट करून तपासणी झाल्यावर रक्कम रिलीज केली जाईल, असे सांगितले.

देशविघातक कार्य करण्यात आपले आधार कार्ड वापरण्यात आले आहे. त्यातून तीन बनावट बँक खाती बनवण्यात आले असून त्यातून ड्रग्ज व मनी लाँड्रिंग करण्यात आल्याने तुम्ही या प्रकरणाची वाच्यता करू नका, अशी धमकी सायबर चोरट्यांनी दिली.

 


कॉपी करू नका.