जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

पुणे (15 मार्च2025) : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता महिलेला एसीबीने लाच प्रकरणात अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. आरोपी लोकसेवकांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार (57), दौंड-शिरूर उपविभागातील उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (55), कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांना ताब्यात घेण्यात आले. बांधकाम ठेकेदाराच्या तक्रारीवरून हा सापळा यशस्वी केला.
असे आहे प्रकरण ?
दौंड तालुक्यातील खुटबाव येथे काही रस्त्यांच्या कामासाठी सप्टेंबर 2024मध्ये निविदा काढण्यात आली. तक्रारदार ठेकेदाराला या रस्त्याचे काम मिळाले होते. दोन्ही कामांचे देयक 40 लाख रुपये होते. बिल मंजुरीची फाईल तयार करण्यासाठी 80 हजार रुपये द्यावे लागतील, असे बगाडे यांनी ठेकेदाराला सांगितले. त्यानंतर त्यांनी उपअभियंता पठारे; तसेच कार्यकारी अभियंता पवार यांची भेट घेतली. त्यांनी या कामाचे देयक मंजुरी; तसेच प्रत्यक्ष पाहणी अहवाल देण्यासाठी 80 हजार रुपये द्यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आवारात सापळा लावण्यात आला. पवार आणि पठारे यांना लाच घेताना पकडण्यात आले. बगाडे यांनी लाचेची रक्कम पठारे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे समोर आले. आरोपींना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक रूपेश जाधव अधिक तपास करीत आहेत.


