कत्तलीसाठी जाणार्‍या चार बैलांची रावेर पोलिसांनी केली सुटका


रावेर (16 मार्च 2025) : कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या सुमारे 80 हजार रुपये किंमतीच्या चार बैलांची पोलिसांनी सुटका केली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यप्रदेश सीमेलगत तालुक्यातील पालजवळील सुलाबर्डी येथून कत्तलीसाठी चार बैल नेत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकाला रवाना केले.

शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता पथकाने जीन्सी येथील सांबरपाठ मंदिराच्या पुढे शेख साबीर शेख मोती (रसलपूर, ता.रावेर) हा चार बैलांना एकमेकांना बांधून, त्यांना काठीने मारहाण करत व पळवत घेऊन जात असताना त्यास अडवण्यात आले. पोलिसांनी 80 हजार रुपये किंमतीचे चार बैल व साबीर शेख यास ताब्यात घेतले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अतुल गाडीलोहार यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील करीत आहेत.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील, हमीद तडवी, कॉन्स्टेबल अतुल गाडीलोहार, संदीप पाटील यांच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !