सतीश भोसलेचे घर वन विभागाने कुठल्या कायद्याने पाडले ? याचे उत्तर मिळायला हवे : आमदार सुरेश धस

बीड (16 मार्च 2025) : तीन दिवसांपूर्वी कुविख्यात खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर पाडल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी भोसले याच्या कुटुंबियांची भेट घेतली. धस म्हणाले की, वन विभागाने नोटीस न देता ही घरे पाडली असून त्यांनी कोणत्या नियमाने हे केले याचे उत्तर द्यायला हवे, असे आमदार धस यावेळी म्हणाले.
मिडीयाने खोक्याला मोठा केला
आमदार धस म्हणाले की, खोक्या एव्हडढा मोठा नाहीय जेवढा मोठा करुन दाखवला. आता त्याची परिस्थिती काय झाली ते बघाना. आता राहायला घर नाही. जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर 307 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक झाली आहे, अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली.
काही सापडलेलं नसताना, नोटीस देऊन ते घर सीझ करायला हवं होतं. ते घर बंद करायला हवं होतं. ते अशिक्षित आहेत, तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता म्हटल्यावर हे कोणत्या कायद्यात बसतं?, असा सवाल सुरेश धस यांनी केला.
या प्रकरणात सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी व्हिडीओ पाहिला. बुलढाणा जिल्ह्यातील जो तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती. इथे पीडित ढाकणे आणि सतीश भोसले एकमेकांच्या जवळ राहतात. हे 307 चं प्रकरण होतं. पण घर पाडण्याचं कारण काय? ही कारवाई कुणाच्या प्रेशरने केली तेच आम्ही बघतोय, असं सुरेश धस म्हणाले.


