मध्यरात्री शेतकर्यावर बिबट्याचा हल्ला : दोन तासांच्या लढाईनंतर बिबट्याचा ओढवला मृत्यू

चिपळूण (16 मार्च 2025) : मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने शेतकर्यावर हल्ला चढवला व स्वरक्षणासाठी शेतकर्यानेही जोरदारपणे प्रतिकार केला. दोन तास चाललेल्या लढाईत अखेर बिबट्याची हार होवून त्याचा मृत्यू ओढवला तर शेतकरी मात्र गंभीर जखमी झाला. चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली गावच्या सीमेवर ही घटना घडली.
असे आहे प्रकरण
तोंडली वारेली गावाच्या सीमेवर आशिष शरद महाजन यांचे एकच घर आहे. पुणे येथून येऊन महाजन यांनी हे घर बांधले असून ते एकटेच या घरात राहतात. शनिवारी देखील ते एकटेच घरात होते. रात्री जेवण झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे झोपी गेले. गावच्या सीमेवर एकच घर आणि आजूबाजूला जंगल असल्याने ते नेहमीच स्वतःच्या संरक्षणासाठी बॅटरी, काठी, सर्प मारण्याचे कावेरू असे साहित्य जवळ बाळगून असायचे. त्या रात्री देखील असे साहित्य त्यांच्या जवळ होते. शनिवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास महाजन यांच्या घराजवळ कुत्रे भुंकायला लागले.
कुत्र्यांचा आवाज भयंकर वाढला. त्यामुळे एका हातात बॅटरी व दुसर्या हातात कावेरू घेऊन आशिष महाजन बाहेर आले आणि समोरचा दरवाजा उघडताच समोरून बिबट्याने थेट त्यांच्यावर हल्ला चढवला. आशिष महाजन ही तात्काळ सावध झाले. हातातील कावेरू ने त्यांनी बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. बिबट्या एकामागून एक जोरदार हल्ले चढवत होता, तर स्वतःला वाचवण्यासाठी व बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी आशिष महाजन देखील जोरदार झटापट करत होते. एकबाजूने प्रहार तर दुसर्या बाजूने प्रतिकार असा थरार तब्बल दोन तास रंगला मात्र अतिशय कडव्या झुंजीनंतर बिबट्यादेखील जखमी झाला. थकला, हडबडला, भुकेने व्याकुळ झाला आणि अखेर जमिनीवर पडला. त्याच्यात जणू त्राण नव्हते. काही वेळेतच त्याने प्राण सोडले.


