प्रशासन हाय अलर्टवर : औरंगजेबाच्या कबरीजवळ जाण्यास सक्त मनाई


छत्रपती संभाजीनगर (17 मार्च 2025) :  खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय कबरीचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला असून कबरीजवळ जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. औरंगजेब प्रकरणावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण तापले आहे. औरंगजेबाची कबर राज्य सरकारने लवकरात लवकर काढावी, अन्यथा कारसेवा करून कबर उद्ध्वस्त करू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने राज्य सरकारला दिल्यानंतर प्रशासन हाय अलर्टवर आहे.

औरंगजेब कबर उखडून टाकण्याच्या विहिंपच्या इशार्‍यामुळे खुलताबाद शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात जाणार्‍या मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. अनावश्यक वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.


औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावले आहेत. तिथे फक्त एकच माणूस प्रवेश करू शकेल अशी व्यवस्था केली आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुख्य दरवाजा पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. एकाचवेळी मोठा मॉब आता प्रवेश करू शकणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीजवळ जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता औरंगजेबाच्या कबरीची पाहणी बाहेरूनच करावी लागणार आहे.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो औरंगजेब स्वराज्यावर चालून आला त्याची कबर इथेच बनली, हा इतिहास जगाला कळायला पाहिजे. आम्ही कुणाच्याही विरोधात जाणार नाही, मात्र हे सरकार बजरंग दलाचे आहे. बजरंग दल प्रशांत कोरटकर, अबू आझमी, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन का करत नाही? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !