एक लाखांच्या बदल्यात दिल्या सात लाखांच्या चिमुकल्यांच्या खेळण्यातील नोटा : मुक्ताईनगर तालुक्यातील दोन आरोपींना बेड्या

बाजारपेठ पोलिसांची कारवाई : अहमदाबादच्या टेलरची फसवणूक : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


भुसावळ (18 मार्च 2025) : एक लाखांच्या मोबदल्यात सात लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत अहमदाबादमधील टेलरला मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे बोलावून लुबाडण्यात आले. आरोपींनी एक लाख रुपये घेवून मोबदल्यात सात लाखांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा दाखवून फसवणूक केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली. आरोपींच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
तक्रारदार हे नदीम अब्दुल सलाम सैफी (मूळ रा.हमीरपूर, तांडा, जि.रामपूर, उत्तरप्रमेश, ह.मु.देवराज इंण्डस्ट्रीज, नरोल चौक, सीटीएमलांबा, अहमदाबाद) हे व्यवसायाने टेलर आहेत. फेसबुक पाहताना त्यांना एक लाख रुपयांच्या मोबदल्यात सात लाख रुपये मिळतील, या जाहिरातीने भुरळ घातली. जाहिरातीच्या 7972403873 या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संशयीत मनजीतसिंग याने जाहिरातीची पुष्टी करीत त्यासाठी मुक्ताईनगर यावे लागेल, असे सांगितले. तक्रारदाराने कुरीयरने नोटा पाठवाव्यात, असे सांगितल्यानंतर आरोपीने तशा पद्धत्तीने नोटा पाठवण्यास नकार दिला व त्यानंतर 14 मार्च रोजी आरोपीने पुन्हा तक्रारदाराला संपर्क केल्यानंतर शनिवार, 15 रोजी दुपारी 1.30 वाजता तक्रारदार रेल्वेने भुसावळात आले.


जंगलात नेत केली फसवणूक
भुसावळ येथून तक्रारदार बसने मुक्ताईनगर आल्यानंतर आरोपींनी त्यांना घेण्यासाठी रीक्षा पाठवली व धामणगाव येथे आणले. यावेळी एक लाख रुपये दिल्यानंतर त्या पाचशे रुपये चलनी नोटांचे प्लॅस्टीक पिशवीत ठेवलेली 14 बंडले देण्यात आली. त्यानंतर तक्रारदार भुसावळात मुक्तामी थांबलेल्या सायली हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी रात्री नोटांचे बंडल उघडून पाहिले असता बंडलच्या पहिले व शेवटी पाचशे रुपयांची नोट होती मात्र आतील बंडलमध्ये ‘भारतीय बच्चो का बँक’ लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळण्यातील सर्व नोटा असल्याने तक्रारदाराला मोठा धक्का बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रविवारी तक्रारदाराने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर आरोपी मनजीतसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार (चारठाणा, ता.मुक्ताईनगर), अविनाथ रुबासन पवार (मधापुरी, ता.मुक्ताईनगर) व एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन आरोपींना अटक
बाजारपेठ पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांची मदत घेत संशयीत आरोपी मनजीतसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार (चारठाणा, ता.मुक्ताईनगर), अविनाथ रुबासन पवार (मधापुरी, ता.मुक्ताईनगर) यांना रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली. दोघा संशयीतांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !