चोरी केल्याच्या संशयातून बोदवडला हॉटेल आचार्याला अमानुष मारहाण : चौघांविरोधात गुन्हा
चोरी केल्याच्या संशयातून बोदवडला हॉटेल आचार्याला अमानुष मारहाण ः चौघांविरोधात गुन्हा
बोदवड (20 मार्च 2025) : हॉटेलमध्ये चोरी केल्याच्या संशयातून हॉटेलमधील आचार्याला (कुक) हात बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना जामनेर रोडवरील हॉटेल साकीमध्ये मंगळवार, 18 रोजी दुपारी दोन ते पाच दरम्यान घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली. संदेश अरुण बुंदेले (24), मनीष कैलास वंजारी (दोघे राहणार बोदवड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण
बोदवड शहरातील मलकापूर रोडवरील राजवीर हॉटेलमध्ये भागवत ओंकार शिंदे (43 जामठी, ता.बोदवड) हे आचारी काम करत होते. यापूर्वी ते जामनेर रोडवरील साकी हॉटेलमध्ये कामाला होते. 18 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिंदे हे राजवीर हॉटेलमध्ये काम करत असताना संदेश अरुण बुंदेले हा तेथे आला. पूर्वी शिंदे हे बुंदेलच्या हॉटेलमध्ये काम करत होते म्हणून त्यांची ओळख होती. संदेश हा राजवीर हॉटेलमध्ये आल्यानंतर शिंदेला दुचाकीवर बसवून त्याच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याचा चुलतभाऊ मनीष वंजारी हा उपस्थित होता.

यानंतर मनीष व संदेश यांनी तू आमच्या हॉटेलमध्ये कामाला असताना खूप वेळा चोरी केली आहे, असा आरोप केला. संदेशने शिंदेचे हात बांधले व त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याला चापट-बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. यानंतर मनीष याने खाट विणण्याच्या दोरीने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी तेथे वैभव व कल्पेश (पूर्ण नाव माहिती नाही) हे दोघे तेथे आले. आणि त्यानीही शिंदे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. 18 मार्च रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
आरोपींच्या ताब्यातून सुटलेल्या नंतर शिंदेनी थेट बोदवड पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी संदेश बुंदेले, मनीष वंजारी या दोघांना अटक केली. या प्रकरणात त्याना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.77




