रावेर तालुक्यातील शेतकर्‍यावर हनी ट्रॅप : एक लाख स्वीकारताना चोपडा तालुक्यातील महिलेला अटक

रावेर पोलिसांची कारवाई ः पाच कोटी रुपये देण्याचा करारनामाही लिहिला


Honey trap on farmer in Raver taluka : Woman from Chopra taluka arrested while accepting one lakh रावेर (20 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील एका गावातील 43 वर्षीय बड्या शेतकर्‍याला महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवले व शारीरीक संबंधाचा व्हिडिओ तयार करीत तो व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपये उकळले शिवाय पाच कोटी रुपये हात उसनवार घेतल्याचा दबाव टाकून करारनामाही बनवला. आपण ट्रॅपमध्ये अडकल्याची खात्री होताच प्रतिष्ठीत शेतकर्‍याने रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर खंडणीसाठी सापळा रचण्यात आला. रावेर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील एसएसबीटी मार्टजवळ बुधवारी दुपारी महिला आली व तिने तक्रारदाराकडून एक लाखांची खंडणी स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिला अटक केली.

असा घडला हनी ट्रॅप
रावेर तालुक्यातील 43 वर्षीय तक्रारदार प्रतिष्ठीत शेतकरी आहेत. 2018 मध्ये स्वतः च्या कारने जळगाव जात असतांना चोपडा तालुक्यातील 43 वर्षीय महिलेने लिफ्ट मागितली. प्रवासात ओळख झाल्यानंतर उभयंतांमध्ये मैत्री वाढली. चोपडा तालुक्यातील महिलेने शेतकर्‍याला घरी बोलावले व त्यानंतर शेतकरी भेटण्यासाठी गेल्यानंतर महिलेने शीतपेयात गुंगीचे औषध टाकल्याने शेतकर्‍याची शुद्ध हरपली व त्यानंतर त्याच्या सोबत शारीरीक संबंध ठेवण्यात आले. या घटनेचे महिलेने व्हिडिओ चित्रण केले व हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शेतकर्‍याला घरी बोलावून शारीरीक संबंध ठेवण्याची धमकी देण्यात आली. यानंतर महिलेने घडल्या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी खंडणी मागण्यास सुरुवात केली.


ऑनलाईन 11 लाख रुपये स्वीकारले
बदनामी टाळण्यासाठी शेतकर्‍याने 43 वर्षीय महिलेसह तिच्या 21 वर्षीय मुलगा निर्मल पाटीलच्या खात्यात 11 लाख रुपये टाकले. हा प्रकार 23 डिसेंबर 2023 पासून घडला. त्यानंतर महिलेची पैशांची हाव वाढत गेली व 21 फेब्रुवारी 2025 रोजी महिलेने तक्रारदाराकडे पाच कोटी रुपये घेतल्याचा लेखी करारनामा केला. महिलेची पैशांची मागणी वाढत गेल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला. त्याने रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना घडलेला प्रकार कथन केल्यानंतर तक्रार देण्याची तयारी दर्शवली व त्यानंतर बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता सापळा रचण्यात आला. रावेर-बर्‍हाणपूर मार्गावरील एस.एस.बी.टी.मार्ट या दुकानाच्या मागील बाजूस महिला खंडणीचे पैसे घेण्यासाठी आल्यानंतर तक्रारदाराने पैसे देताच महिलेला पथकाने अटक केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई रावेर पोलीस निरीक्षक विशाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे, महिला पोलीस माधवी सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल महेश मोगरे ,सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण आदींच्या पथकाने केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !