हरभरा नेला कापून अन दादरवर फिरवले ट्रॅक्टर : नशिराबाद शिवारातील घटना


जळगाव (20 मार्च 2025) : वडिलोपार्जित शेतात दीड एकर क्षेत्रात काढणीसाठी तयार असलेला हरभरा कापून नेला… आणि एक एकरातील दादरच्या पिकावर ट्रॅक्टर चालविले. यात शेतकर्‍याचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. हातेड नाल्याच्या काठावरील नशिराबाद शिवारात ही घटना गुरुवारी (6 मार्च) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेमंत दुल्लभ बेलसरे (वय 64, रा. नशिराबाद ह.मु. रायसोनी नगर, जळगाव) यांची नशिराबाद शिवारात हातेड नाल्याच्या काठावर 3 हेक्टर 49 आर शेती आहे. हेमंत बेलसरे यांच्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी हरभरा तसेच दादर पिकाची पेरणी केली होती. 6 मार्च 2025 रोजी ते पीक पाहणीसाठी शेतात आले असता तयार झालेला हरभरा कापून नेल्याचे त्यांना दिसले. तर दादर पिकावर ट्रॅक्टर चालवून नेल्याने नुकसान झाले आहे.


सुभाष श्रीधर राणे (महाबळ जळगाव) यांचा कुठलाही मालकी वा अधिकार नसताना या शेतावर कब्जा करण्याचा ते प्रयत्न करतात, असे बेलसरे यांचे म्हणणे आहे. या संदर्भात अधिक तपास केला असता राणे यांनी आसोदा गावातून ट्रॅक्टर व मजूर आणून माझ्या शेतातील हरभरा कापून नेला व ट्रॅक्टर चालवून दादर पिकाची नासाडी केली.

या प्रकारातून शेतकर्‍याचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतकर्‍याच्या तक्रारीनुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !