मुंजलवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू


रावेर (22 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शेत-शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गावातील शेतकरी, शेतमजुरांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागते व त्यातच ही घटना समोर आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बिबट्याचा वावर : शेतकरी भयाच्या सावटाखाली
रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शेती शिवारातील देवराम बळीराम पाटील यांच्या शेतात याकुब लालखा तडवी यांची गुरे बसवण्यात आली आहेत. शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक गायीच्या तीन वर्षाच्या वासरावर हल्ला केला. गुराखी याकुब तडवी यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी सुद्धा बिबट्याचा पाठलाग केला मात्र तो पर्यंत बिबट्याने वासराला ठार मारले. ही वार्ता मुंजलवाडी गावात वार्‍यासारखी पसरताच मुंजलवाडी पोलीस पाटील राधेश्याम धनगर, अशोक हिवराळे, प्रवीण अजलसोंडे, अतुल पाटील, अय्युब तडवी, सोनू पाटील, सुरज हिवराळे यांनी पाहणी केली. वनविभागाला घटनेबाबत माहिती समजताच रावेरचे वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी वनकर्मचारी घटनास्थळी रवाना केले. वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !