तीन हजारांची लाच घेताच तलाठ्याला एसीबीकडून बेड्या
अहिल्यानगर (25 मार्च 2025) : तीन हजारांची लाच घेताना पाडळी आळे, ता.पारनेर तलाठ्याला एसीबीने अटक केली आहे. आशीर्वाद प्रभाकर घोरपडे, (34, घर नं.155, पाईपलाईन हडको एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
35 वर्षीय तक्रारदार हे पाडळी आळे, ता.पारनेर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आत्या ह्या शेजारच्या कळस ता.पारनेर या गावच्या मूळ रहिवासी असून त्या अशिक्षित आहेत. कळस येथे तक्रारदार यांच्या आत्याचे पती यांचे नावे शेत जमिनीचे गट क्रमांक 37 व गट क्रमांक 48 असे दोन गट आहेत. तक्रारदार यांच्या आत्याचे पती हे दिनांक 6/8/2023 रोजी मयत झाले होते. तक्रारदार यांचे आत्याच्या पतीच्या नावे असलेल्या शेत जमिनीला वारसदार आहेत. शेतजमिनीला वारस नोंद लावण्यासाठी पाडळी आळीचे तलाठी यांच्याकडे सर्व संबंधित कागदपत्रे एक महिन्यापूर्वी जमा केली होती. तक्रारदार यांच्या आत्या ह्या अशिक्षित तसेच वयोवृद्ध असल्याने व तक्रारदार यांचा आते भाऊ हा पनवेल नवी मुंबई येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या कळस येथील शेत जमिनी बाबतच्या वारस नोंदीच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांच्या आत्या यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले आहे. वारस नोंद लावण्याकरिता लोकसेवक घोरपडे, तलाठी सजा पाडळी आळे यांनी पाच हजारांची लाच मागणी केल्याबाबतची तक्रार 24 मार्च 2025 रोजी एसीबीच्या अहिल्यानगर कार्यालयाला प्राप्त झाली होती. लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने 24 मार्च 2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक आशीर्वाद प्रभाकर घोरपडे, तलाठी सजा पाडळी आळे, ता.पारनेर यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे शेत जमिनीची वारस नोंद लावण्यासाठी तीन हजारांची लाच मागून तीन स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

24 मार्च रोजी पाडळी आळे, तलाठी कार्यालय, ता.पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक घोरपडे यांनी तक्रारदाराकडून तीन हजार घेताच त्यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, चालक हवालदार दशरथ लाड आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.




