भुसावळ तालुक्यात रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

महसूल प्रशासनाची मोहिम : शेतकर्‍यांना मोठा दिलासा


भुसावळ (25 मार्च 2025):  भुसावळ महसूल प्रशासनाने सर्व महसूल मंडळांत मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत अतिक्रमित रस्ते मोकळे करण्याची कारवाई सुरू केल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवार, 22 मार्च रोजी पिंपळगाव व खडके मंडळांत किन्ही ते साकरी या दोन गावांमधील शिवरस्ता दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून काही शेतकर्‍यांनी अतिक्रमण करून बंद केला होता. यावेळी खडका मंडळाधिकारी प्रवीण पाटील व पिंपळगाव मंडळ अधिकारी एफ.एस.खान, किन्ही व साकरी तलाठी यांनी लोकसहभागातून रस्ता मोकळा केल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला.

शेतकर्‍यांना दळण-वळण झाले सुलभ
या मोहिमेमुळे किन्ही ते साकरी शिवरस्ता (अंदाजे 3 कि.मी. रस्ता, रुंदी 5 पूर्णांक 5 मीटर) 18 शेतकरी तसेच साकरी ते किन्ही रस्ता (लांबी 1 कि.मी., रुंदी 4 मीटर) 74 खातेदार शेतकर्‍यांना रस्ता मोकळा झाल्यामुळे फायदा झाला आहे.




तळवेल-बोहर्डी शिवरस्त्याने घेतला मोकळा श्वास
वरणगाव मंडळात मंडळाधिकारी रजनी तायडे, तळवेल व ओझरखेडा तलाठी यांच्या पथकाने भू अभिलेख कार्यालय भुसावळच्या कर्मचार्‍यांच्या सहाय्याने तळवेल-बोहर्डी शिवरस्ता मोकळा करण्याची मोहिम हाती घेतली. शेतकर्‍यांनी बर्‍याच वर्षांपासून हा रस्ता अतिक्रमण करून बंद करण्यात आला होता. पथकाने हा रस्ता मोकळा करून अंदाजे लांबी 2 कि.मी., रुंदी 4. पूर्णांक पाच मीटर असलेल्या रस्त्याचा 83 खातेदार शेतकर्‍यांना फायदा झाला. तळवेल-वरणगाव शिवरस्ता (लांबी 2 कि.मी., रुंदी 4 पूर्णांक 5 मीटर) देखील अनेक वर्षांपासून बंद असल्याने त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून तो मोकळा करण्यात आला. या रस्त्याचा 97 शेतकर्‍यांना फायदा झाला.

शेतकर्‍यांचे जीवनमान होणार सुलभ
तहसीलदार नीता लबडे म्हणाल्या की, भुसावळ तालुक्यातील एकूण 10 रस्ते मोकळे करण्याचे नियोजन केले आहे. या मोहिमेमुळे शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीवर जाण्यासाठी रस्त्यांचा वापर करता येणार आहे शिवाय त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !