वेल्हाळे शिवारात पत्नीची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला पुण्यात बेड्या
भुसावळ (25 मार्च 2025) : मद्यपी पतीने कौटुंबिक वादातून सना अजीज शेख (25, बीड, जि.परळी, वैजनाथ) या विवाहितेची हत्या करीत पळ काढला होता. ही घटना वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील वीटभट्टीवर रविवारी मध्यरात्री घडली होती. पसार झालेल्या आरोपी पतीला पुण्यात गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. अजीज सलीम शेख (35) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मद्यपी पतीकडून पत्नीचा छळ
किशोर डिगंबर पाटील यांचे वेल्हाळे शिवारातील शेत गट क्रमांक 651 मध्ये शेत असून या शेतात अली हुसेन इसाक कुरेशी हे वीटभट्टी चालवतात. या वीटभट्टीवर कामासाठी परळी जिल्ह्यातील काही कुटूंब आले आहेत व तेथेच त्यांचा कुटूंबातील सदस्यांसह रहिवास आहे. अझहर नियोजोद्दीन शेख (24, जुने स्टेशन परळी वैजनाथ, जि.बीड, ह.मु.वेल्हाळा शिवार, गट क्रमांक 651, भुसावळ) हेदेखील आपली मोठी बहिण सना व मेहुणा अजीज शेख तसेच आई, वडिल, भाऊ, वहिनी आदींसह वीटभट्टीवर कामाला आहेत. संशयीत अजीज शेख याला दारूचे व्यसन असल्याने तो सना शेख यांचा सातत्याने छळ करून मारहाण करीत होता व हा दररोजचा प्रकार असल्याने यास सर्व कंटाळले होते.

मध्यरात्री खून करीत काढला पळ
शनिवारी अझहर शेख, शर्फू, कृष्णा, ज्वाला, अजीज शेख यांनी वरणगाव येथे बाजारासाठी येत बाजारहाठ केला व यावेळी पुन्हा अजीज शेख याने मद्य प्राशन करून रात्री सव्वाआठ वाजता वीटभट्टी गाठली. मध्यरात्रीच्या सुमारास अजीज शेख याने पत्नी सनासोबत पुन्हा वाद घातला व दारूच्या नशेत तिचा गळा आवळला. रविवारी सकाळ होवूनही कुटूंब बाहेर न आल्याने अझहर शेख यांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर सना या निपचीत झोपल्या असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दार तोडून खोलीत प्रवेश केला असता सना यांच्या नाकातून रक्त येत असल्याने कुटूंबाने त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अझहर नियोजोद्दीन शेख (24, जुने स्टेशन परळी वैजनाथ, जि.बीड, ह.मु.वेल्हाळा शिवार, गट क्रमांक 651, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी पती अजीज सलीम शेख (35) विरोधात वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत मध्यरात्रीच खुनानंतर पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला होता.
आरोपीला पुण्यात पडल्या बेड्या
खुनानंतर पसार झालेल्या आरोपी पती अजीज सलीम शेख (35) यास पुण्यात जळगाव गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी बेड्या ठोकल्या. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व कृष्णा देशमुख यांच्या पथकाने केली.




