मध्यप्रदेशातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू : गळफास दिल्याचा संशय
रावेर (27 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील पाल येथील सुकी नदी पात्राजवळ मध्यप्रदेशातील मूळ रहिवाशी असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश सुमर्या बारेला (25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गळफास दिल्याचा संशय
पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राच्या खाली नदी पात्रात पाल गावाकडे जाणार्या कच्चा रोडच्या बाजूला सुरेश सुमर्या बारेला (25) या तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाच्या मानेवर गळफास दिल्याचे निशाण असून हा तरुण मध्यप्रदेशातील कलोरी, ता.जि.खंडवा येथील मूळ रहिवासी आहे मात्र कामानिमित्त त्याचा मुक्काम दापुरे, ता.एरंडोल येथे आहे. 25 मार्चच्या दुपारी 12 ते 26 मार्चच्या सकाळी 10 वाजेदरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याबाबत चिंपी सुरेश बारेला यांनी माहिती दिल्यावरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अधिकार्यांची भेट
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जैस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी धाव घेतली. घटनास्थळी भेट देऊन जैस्वाल यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवला. डॉ.वैभव गिरी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले मात्र पीएम रिपोर्ट आल्यानंतर सुरेशचा मृत्यू कशामुळे झाला ? याबाबत स्पष्टता येणार असून तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.




