जळगावात आठ लाखांचा रामबंधू पापड मसाला लांबवला : भुसावळातील चालकासह चौकडीला बेड्या
एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : मुद्देमाल यंत्रणेकडून जप्त
जळगाव (1 एप्रिल 2025) : जळगाव एमआयडीसीतील गोदामातून साडेआठ लाख रुपये किंमतीचा रामबंधू पापड मसाला नुकताच चोरीला गेला होता. एमआयडीसी पोलिसांनी तपासादरम्यान हा गुन्हा 15 वर्षांपासून गोदामात काम करणार्या व भुसावळातील रहिवासी असलेल्या आरोपीने केल्याची माहिती निष्पन्न करीत त्याच्यासह चौकडीला बेड्या ठोकल्या.
काय घडले जळगावात
अतुल विश्वनाथ मुळे यांचे मालकीची एमआयडीसी येथील एम सेक्टर 211/2 येथे श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स नावाची कंपनी आहे. ही कंपनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये रामबंधु मसाले कंपनीची अधिकृत डीलरशीप सांभाळते. 25 मार्च 2025 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊनचे शटर तोडून सुमारे आठ लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 71 गोण्या चोरून नेल्या.

27 मार्च 2025 रोजी अतुल मुळे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांनी त्वरित तपास पथक स्थापन केले. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, तसेच पोलीस कर्मचारी राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर, रतन गीते यांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधून इको कारचा वापर करत गोडाऊन फोडल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने वापरलेले वाहन आणि त्यातील व्यक्तींची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान, फिर्यादी अतुल मुळे यांचे मागील 15 वर्षांपासून चालक असलेले अनिल रमेश पाटील (रा. मिल कॉलनी, खडका, भुसावळ) यांनीच त्यांच्या साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. अनिल पाटीलला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली.
त्यानुसार संशयित बाबुराव त्र्यंबक सुरवाडे (रा. पळासखेडा, ता. जामनेर), शिवा सुरेश पाटील (रा. भवानी नगर, खडका, भुसावळ), राहुल बाविस्कर (रा. खडका, ता. भुसावळ) यांना पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली. त्यांना 02 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींकडून. चोरीस गेलेल्या सर्व 71 गोण्या आठ लाख 35 हजार रुपये किंमतीच्या आणि चोरीसाठी वापरलेली दोन इको वाहने जप्त करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कर्मचारी योगेश घुगे करीत आहेत.




